महाकाली मंदिरात देवीच्या भव्य लाकडी मूर्तीचे होणार दर्शन; भक्ताने लाकडी मूर्ती दिली दान
By साईनाथ कुचनकार | Published: February 21, 2024 03:40 PM2024-02-21T15:40:15+5:302024-02-21T15:40:45+5:30
चंद्रपूर येथील व्यावसायिक आणि बालाजी वाॅर्डातील रहिवासी गणेश अरुण झाडे यांची महाकाली देवीवर अपार श्रद्धा आहे.
चंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली देवी विदर्भातच नाही तर मराठवाडा, तेलंगणा व आंध्र प्रदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. यातीलच एका चंद्रपुरातील भाविकाने महाकाली मंदिराला महाकाली देवीची हुबेहूब दिसणारी भव्य लाकडी मूर्ती भेट दिली आहे. ही लाकडी मूर्ती मंदिरातील गाभारा परिसरात लावण्यात आली असून सुबक आणि प्रसन्न वाटणाऱ्या या मूर्तीचे भाविकांना दर्शन होत आहे.
चंद्रपूर येथील व्यावसायिक आणि बालाजी वाॅर्डातील रहिवासी गणेश अरुण झाडे यांची महाकाली देवीवर अपार श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी त्यांनी मंदिराला भव्य लाकडी मूर्ती भेट देण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी येथील मूर्तिकार भालचंद्र बुरडकर यांच्यासोबत संपर्क करून मूर्ती तयार करण्यासाठी नियोजन केले. यासाठी बल्लारशाह येथील डेपोतून सागवान लाकूड आणण्यात आले. या लाकडातून ६ फूट बाय ४.५० फूटची महाकाली देवीची हुबेहूब मूर्ती तयार करण्यात आली. देवीचे डोळे सोन्याने मळण्यात आले. त्यामुळे ही मूर्ती अधिकच आकर्षक दिसत आहे. ही मूर्ती मंदिराला दान करण्यात आली असून मंदिर प्रशासनाने मंदिर गाभाऱ्यामध्ये ही लाकडी मूर्ती लावण्यात आली आहे.
तयार करण्यासाठी लागले दोन महिने
मूर्तिकार भालचंद्र बुरडकर यांनी लाकडापासून देवीची मूर्ती तयार केली. महाकाली देवीची लाकडापासून हुबेहूब मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला.
बाॅक्स
लाकूड बल्लारशा डेपोतील
चंद्रपूर जिल्ह्यात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. बल्लारशाह येेथे लाकूड डेपो आहे. या डेपोतून अयोध्या येथील मंदिरासाठी सागवान लाकूड नेण्यात आले होते. याच डेपोतील सागवान लाकूड घेऊन महाकाली देवीची मूर्ती साकारण्यात आली आहे.
डोळे सोन्याचे
दान देण्यात आलेल्या या लाकडी मूर्तीला सोन्यापासून तयार करण्यात आलेले डोळे लावण्यात आले आहे. त्यामुळे ही मूर्ती अधिकच आकर्षक आणि प्रसन्न दिसत आहे.