'शिक्षणा'साठी एक 'दानशूर' असाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 04:44 PM2024-05-13T16:44:24+5:302024-05-13T16:49:38+5:30
Chandrapur : गावातील विद्यार्थ्यांवर इकडे-तिकडे भटकण्याची वेळ येऊ नये म्हणून बाखर्डी या लहानशा गावातील एका दानशूराने स्वमालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन दिली जिल्हा परिषदेला दान
चंद्रपूर : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. बाबासाहेबांचे विचार आपल्या गावातील नागरिकांनाही समोर नेऊ शकते. आपल्या गावातील प्रत्येक जण शिकला पाहिजे. शिक्षण घेऊन ते उच्चपदावर पोहोचले पाहिजे. यासाठी प्रत्येकांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांना इकडे-तिकडे भटकण्याची वेळ येऊ नये यासाठी कोरपना तालुक्यातील बाखर्डी या लहानशा गावातील एका दानशूराने स्वमालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन जिल्हा परिषदेला दान दिली. या जमिनीवर शाळा इमारत उभी असून आजपर्यंत शेकडो जणांनी शिक्षण घेत आपले जीवन सुकर केले आहे. बबन पांडुरंग मत्ते असे या दानशूराचे नाव असून ते ८८ वर्षांचे आहेत.
कोरपना तालुक्यातील भोयेगाव-गडचांदूर मार्गावर बाखर्डी हे गाव आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सुविधा होती. पुढील शिक्षणासाठी गावातील विद्यार्थ्यांना इतरत्र शिक्षण घ्यायला जावे लागायचे. ही खदखद गावातील बबन पांडुरंग मत्ते यांना सतावत होती. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना गावात दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांची सारखी धडपड सुरू होती. त्यांची ही धडपड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. यासाठी त्यांनी १९९१ ला जिल्हा परिषद प्रशासनाकडे विनंती केली आणि गावात ८ ते १० वीपर्यंत शाळा सुरू करण्याची मागणी केली. मात्र गावात असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये जागा अपुरी पडत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी समोर केली.
यावेळी मात्र त्यांनी कोणताही विचार न करता गावाच्या भल्यासाठी भोयेगाव- गडचांदूर मार्गावरील आपल्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन जिल्हा परिषद शाळेसाठी दान देण्याची तयारी केली. तयारी करूनच ते थांबले नाही तर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना जमीन दान देण्याचे संपूर्ण सोपस्कार पार पाडले. त्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या हातात जमीन दान दिल्याचे कागदपत्र दिले. त्यानंतर मात्र गावात ८ ते १० वीची शाळेची इमारत बांधून त्यांच्या जागेवर शाळा सुरू करण्यात आली. आजपर्यंत या शाळेतून शेकडो विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन केले आहे. यातील अनेक जण विविध ठिकाणी मोठमोठ्या पदावर अधिकारी, कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तर काही डॉक्टर, वकीलसुद्धा झाले आहे. हे सर्व बघून बबन मत्ते यांना समाधान वाटत असले तरी सध्याची शाळेतील विद्यार्थ्यांची घटलेली संख्याही त्यांना फार सतावत आहे.
केवळ ज्ञानार्जनासाठीच व्हावा वापर
■ दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांतील स्थिती बिकट होत आहे. बाखर्डी येथीलही शाळेतील विद्यार्थी संख्या सध्या घटली आहे. त्यामुळे भविष्यात ही शाळा बंद पडू नये, आपण ज्या उद्देशाने शाळेला जमीन दान दिली. तिचा उपयोग केवळ ज्ञानार्जना- साठीच व्हावा, अशी इच्छाही बबन मत्ते यांनी व्यक्त केली आहे.
खासगी शाळाही सुरू करता आली असती
■ सामाजिक कार्याने झपाटलेल्या बबन मत्ते यांनी केवळ समाजासाठी काहीतरी करण्याचाच विचार केला. इतरांसारखी त्यांनीही शाळा सुरू करून स्वतःचे नाव करता आले असते, अनेकांना त्या शाळेत नोकरीसुद्धा लावता आली असती, मात्र मुळात सामाजिक कामच करण्याचा त्यांचा उद्देश असल्याने त्यांनी कोणत्याही भानगडीत पडण्याचा विचारसुद्धा केला नाही. आपल्या मालकीची गडचांदूर-भो- येगाव या रोडवरील जमीन दान देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उभे केले.