स्पर्धा उलटून महिना लोटला, मात्र बक्षीसच मिळेना; क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा भोंगळ कारभार

By परिमल डोहणे | Published: January 10, 2024 05:25 PM2024-01-10T17:25:16+5:302024-01-10T17:25:40+5:30

बक्षीस वितरणादरम्यान केवळ प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचे बोळवण करण्यात आले आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

A month passed after the competition, but the prize was not received; Mismanagement of Directorate of Sports and Youth Services | स्पर्धा उलटून महिना लोटला, मात्र बक्षीसच मिळेना; क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा भोंगळ कारभार

स्पर्धा उलटून महिना लोटला, मात्र बक्षीसच मिळेना; क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा भोंगळ कारभार

चंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्यातर्फे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर युवा महोत्सव पार पडला. या महोत्सवाला महिनाभरापेक्षा अधिकचा कालावधी लोटला. मात्र विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले नाही. बक्षीस वितरणादरम्यान केवळ प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचे बोळवण करण्यात आले आहे. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजित करण्यात येत असतो. २९ नोव्हेंबरला सांस्कृतिक सभागृह, नगर परिषद, बल्लारपूर येथे जिल्हा स्तरीय क्रीडा महोत्सव पार पडला. त्यानंतर नागपूर येथे विभागस्तरीय तर लातूर येथे राज्यस्तरीय महोत्सव पार पडला. या महोत्सवात समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, कथाकथन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फोटोग्राफी यासह विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये राज्यभरातील विविध विद्यार्थी सहभागी झाले होते. मात्र, स्पर्धा झाल्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमात केवळ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. मात्र, रोख बक्षीस देण्यात आले आहे. जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय फेरीतही असाच प्रकार घडला. त्यामुळे बक्षीस कधी मिळेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

अनेक महाविद्यालयांकडूनही मदत नाही

विद्यार्थ्यांना जिल्हा, राज्य, विभागीय स्पर्धेसाठी प्रवास, ड्रेसिंग, आदी साहित्यासाठी बराच खर्च करावा लागला. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची व्यवस्था करून दिली, तर अनेक महाविद्यालयांनी साधा प्रवास खर्चसुद्धा दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:च पैसे गोळा करून स्पर्धा जिकंली. मात्र, अद्यापही बक्षीस मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांत नाराजी पसरली आहे. महाविद्यालयांनी स्पर्धेत बक्षीस मिळविल्यानंतर संस्थेकडून, तसेच प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांची मोठी वाहवाहकी केली जाते. मात्र, स्पर्धेसाठी खर्चाची तरतूद का करीत नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून होत आहे.

अद्यापही अनुदान आले नाही. त्यामुळे रोख बक्षीस थकीत आहे. ३१ मार्चच्या आत बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. - अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: A month passed after the competition, but the prize was not received; Mismanagement of Directorate of Sports and Youth Services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे