सलग २०० दिवस वीजनिर्मिती करून सीएसटीपीएसचा नवा विक्रम!
By राजेश भोजेकर | Published: November 28, 2023 04:22 PM2023-11-28T16:22:07+5:302023-11-28T16:23:42+5:30
या केंद्रात ५०० एमडब्लूचे पाचवा संच व २१० एमडब्लूचे दुसरा संच कार्यान्वित आहेत
राजेश भोजेकर, चंद्रपूर: महाऔष्णिक विद्युत केंद्र हे सद्यस्थितीत २९२० एमडब्लू स्थापित क्षमतेचा विद्युत निर्मिती केंद्र आहे. या केंद्रात ५०० एमडब्लूचे पाचवा संच व २१० एमडब्लूचे दुसरा संच कार्यान्वित आहेत. महाराष्ट्राला नियमित व स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात या केंद्राचे मोठे योगदान आहे. केंद्रातील आठव्या क्रमांकाच्या संचाने उत्पादनाचे अनेक विक्रम गाठले होते. त्यातच आता याच संचाने पुन्हा सलग २०० दिवस वीज निर्मिती करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इतिहासात संच क्र. आठवे हे २०० दिवस सतत कार्यरत राहणारे दुसरे संच आहे. याआधी २००९ मध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या संचाने सातत्याने २०० दिवस सतत वीज निर्मिती करण्याचा विक्रम स्थापित केला होता. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर हा टप्पा संच क्र. ८ ने गाठला आहे. विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार यांनी सर्वांचे कौतुक करीत चमूंचे परिश्रम व कार्याप्रती समर्पणामुळेच हा टप्पा गाठता आला, असा उल्लेख केला.
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, संचालक (संचलन) संजय मारुडकर, संचालक (खनिकर्म) डॉ. धनंजय सावळकर, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (प्रकल्प) अभय हरणे, कार्यकारी संचालक (संवसू-२) पंकज सपाटे, कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) डॉ. नितीन वाघ, कार्यकारी संचालक (संवसू-१) राजेश पाटील आदींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काैतुक केले.