दुचाकीच्या डिक्कीतून पर्स पळविली; आझाद गार्डन परिसरातील घटना
By साईनाथ कुचनकार | Published: June 16, 2023 07:56 PM2023-06-16T19:56:09+5:302023-06-16T19:56:29+5:30
आझाद गार्डन परिसरात दररोज सकाळी मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येतात.
चंद्रपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद गार्डन परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेची वाहनतळामध्ये ठेवलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी पर्स पळविली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. यासंदर्भात शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचेही उघड झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
आझाद गार्डन परिसरात दररोज सकाळी मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येतात. शुक्रवारी सकाळी घुटकाळा परिसरातील मीनाक्षी राजू अलोने या सुद्धा दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ बीवाय ५५२३ क्रमांकाच्या दुचाकीने आल्या होत्या. वाहनतळावर दुचाकी ठेवून त्या फिरण्यासाठी गेल्या असता दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी पळविली. या पर्समध्ये १३ हजार रुपये तसेच अन्य काही वस्तूदेखील होत्या. मीनाक्षी फिरून परत आल्यानंतर त्यांना दुचाकीची डिक्की उघडी असल्याचे दिसली. तत्काळ त्यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली. दरम्यान, काही नागरिकांनी बगिच्यामध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला असता सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले. घटनेनंतर शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद गार्डनमध्ये सकाळी चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही सुरू करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.