चंद्रपूरच्या जंगलात औषधीयुक्त गुण असलेला दुर्मिळ पिवळा पळस
By राजेश भोजेकर | Published: March 13, 2023 02:43 PM2023-03-13T14:43:55+5:302023-03-13T14:45:31+5:30
अतिशय दुर्मिळ असा हा पिवळ्या रंगाचा पळस आकर्षणाचे केंद्र ठरला आहे
चंद्रपूर : चंद्रपूरचे जंगल वैविध्याने समृद्ध आहे. या जंगलात दुर्मिळ पिवळा पळस मिळाला आहे. पिवळा पळस विविध अर्थांनी गुणकारी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्लीच्या जंगलालगत एका शेतात तलावाच्या शेजारी पिवळ्या रंगाचा पळस पाहावयास मिळतो. औषधीयुक्त गुणांचा आणि अतिशय दुर्मिळ असा हा पिवळ्या रंगाचा पळस आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. पांढरा, निळा, पिवळा आणि लाल अशा चार रंगांत पळस उपलब्ध असले तरी यातील साधारणत: लाल रंगाचा पळस संख्येने जास्त आहे.
ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा पळस आहे त्याचा विरोध असतानाही एक खांदा बाहेरचे लोक तोडून घेऊन गेले आहेत, असे ते सांगत होते. याला शेंगा लागलेल्या आहेत, यांच्यातून नवीन झाड यावर्षी करायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे ते म्हणाले. येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांच्यामुळे हा दुर्मिळ पळस पहायचा योग येथील वनस्पती व प्राणी अभ्यासकांना प्राप्त झाला, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, शरद पवार कॉलेज गडचांदूरचे प्राचार्य डॉ. संजय सिंग, प्रा. योगेश दुधापाचारे यांच्यासह अनेकांनी वेळातून वेळ काढून हा पळस बघितला व त्याचे वैशिष्ट्य सांगितले.