पुण्यातील आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनात चंद्रपूरचे प्रतिबिंब!
By राजेश मडावी | Published: June 15, 2023 04:49 PM2023-06-15T16:49:06+5:302023-06-15T16:49:45+5:30
बौद्धिक मेजवानी : डाॅ. विनायक तुमराम यांच्या ग्रंथाचेही होणार प्रकाशन
चंद्रपूर : बल्लारपूर येथील आदिवासी साहित्य व संस्कृती संवर्धन संस्था व पुण्यातील विदिशा विचार मंचाच्या वतीने पुणे येथे १८ जून २०२३ रोजी सकाळी ९: ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डॉ. माधवराव पटवर्धन सभागृहात पाचवे आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन तसेच चंद्रपूरचे प्रसिद्ध विचारवंत डाॅ. विनायक तुमराम यांच्या 'रानवादळातील दिवेलागण' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हाेणार आहे. संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ कवी प्रा. विश्वास वसेकर भूषवतील. हे संमेलन समग्र आदिवासींसाठी दिशादर्शक ठरणार आहे, अशी माहिती आदिवासी साहित्य व संस्कृती संवर्धन संस्थेचे सचिव सुनील कुमरे यांनी दिली.
ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन, तर स्वागताध्यक्षपदी प्रा. डॉ. संभाजी मलघे, डॉ. भौमिक देशमुख तसेच प्रमुख पाहुणे डॉ. वि. स. जोग, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ, डॉ. विनायक तुमराम, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशिका सुनीताराजे पवार, कादंबरीकार डॉ. विनोद कुमरे उपस्थित राहतील. दुसऱ्या सत्रात 'आदिवासी प्रतिभावंतांमधील वैचारिक अंतर्विरोध : किती घातक, किती पोषक?' यावर परिसंवाद होईल.
अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा भवारी तर डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर, डॉ. कुंडलिक केदारी, रामराजे आत्राम, प्रा. सुरेंद्र बुराडे विचार मांडतील. संचालन तुलसीदास भोयर करतील. तिसऱ्या सत्रात रामचंद्र जंगले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. डॉ. हनुमंतराव भवारी भूमिका मांडतील. सुदाम गैंगजे हे आभार मानतील, अशी माहिती सुनील कुमरे व विदिशा विचार मंचाच्या ममता क्षेमकल्याणी यांनी दिली