दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रंगांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 05:00 AM2022-03-18T05:00:00+5:302022-03-18T05:00:39+5:30
सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली. सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांना निर्बंधात राहून रंगपंचमीचा आनंद साजरा करता आला नाही. यंदा हे चित्र बदलले असून, नागरिकांना मनमुराद रंगांची उधळण करता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून होळी, धुळवडीच्या आनंदाला नागरिक पारखे झाले होते. कोरोनापासून स्वत:ला वाचविण्याची साऱ्यांचीच धडपड दिसून आली. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने वेग पकडला. तो कालावधीही होळीच्या आसपासचा होता. अनेक व्यवहार ठप्प होते. यंदा कोरोना ओसरल्याने रंगांची बेधुंद उधळण होणार आहे. रंग, पिचकारी व मुखवटे खरेदीसाठी लहान- मोठ्यांनी चंद्रपुरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी केल्याचे गुरुवारी दिसून आले.
गतवर्षी कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने होळी गुढीपाडवा, रामनवमी, चैत्र नवरात्र आणि शब-ए-बारात यासारखे सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घालती होती. सणासुदीच्या काळात रुग्णांची संख्या वाढणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे पालन व्हावे म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात निर्बंध लादण्यात आले होते. वाहतुकीवर काही बंधने घातली.
सार्वजनिक व खासगी पद्धतीने होळी, धुळवड, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे नागरिकांना निर्बंधात राहून रंगपंचमीचा आनंद साजरा करता आला नाही. यंदा हे चित्र बदलले असून, नागरिकांना मनमुराद रंगांची उधळण करता येणार आहे.
गांधी चौकात दुकाने गजबजली
चंद्रपुरातील गांधी चौक व विविध मार्गावर यंदा रंग, पिचकारी, गुलाल व अन्य वस्तू विकणाऱ्या हंगामी दुकानांची संख्या वाढली. गांधी चौकातही अनेक दुकाने लागली आहेत. कोरोनापासून थोडी मुक्ती मिळाल्याने यंदाच्या होळीसाठी लहान मुले आणि मोठ्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. रात्री ८ वाजतापर्यंत दुकानामध्ये गर्दी दिसून आली.
रासायनिक रंग अपायकारक
बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या व मुखवटे विक्रीसाठी आले. धूलिवंदनामध्ये रंग खेळण्यात व उधळण्यात मोठी मजा येते. मात्र, रंग वापरताना ते रासायनिक राहणार नाही, याची काळजी घ्यावी. याकडे दुर्लक्ष केल्यास हे रंग आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
सुरक्षेसाठी पोलिसांचा अलर्ट
होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणाने अलर्ट जारी केला आहे. होळी आणि रंगपंचमी हे भारतीय संस्कृतीतील विशेष सण असल्याने त्यांचे महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी रंग उडविण्याच्या कारणावरून वादविवाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले. तालुका व जिल्हास्थळी पोलीस तैनात करण्यात आले.