दोरीने बांधून श्वानाला अमानुष मारहाण; चंद्रपुरातील संतापजनक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 06:00 PM2022-04-05T18:00:23+5:302022-04-05T18:23:00+5:30
चंद्रपूर येथील पठाणपुरा परिसरात एक मोकाट श्वान थांबून असलेल्या ऑटोत बसला. यामुळे, संतापलेल्या एकाने या श्वानाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली व त्याला मरनासन्न अवस्थेत त्याला सोडून दिले.
चंद्रपूर : उभ्या असलेल्या ऑटोमध्ये श्वान बसल्याच्या कारणावरून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना चंद्रपुरातील पठाणपुरा परिसरात उघडकीस आली. मरनासन्न अवस्थेत त्याला सोडून दिल्यानंतर प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत त्याच्यावर उपचार सुरू केले.
यासंदर्भात संबंधित व्यक्तीविरुद्ध फाउंडेशनचे सदस्य शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत रात्री उशिरापर्यंत तक्रार घेतलीच नसल्याची माहिती आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकजण थंड आणि सावलीच्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, मोकाट प्राण्यांचे या उन्हाळ्यात बेहाल होत आहे. उन्हाच्या दाहकतेतच त्यांना पाणी, खाद्य शोधावे लागत आहे. मोकाट प्राणी दुपारच्या वेळी सावलीच्या ठिकाणी आधार घेत असल्याचे चित्र आहे. अशीच घटना पठाणपुरा येथेही घडली. मोकाट श्वान थांबून असलेल्या ऑटोत बसला. यामुळे, संतापलेल्या एकाने या श्वानाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. या श्वानाचे चुकले असले तरी बेदम मारहाण करणे चुकीचे आहे, असे करू नका असे आवाहन प्यार फाउंडेशच्या सदस्यांनी केले आहे.
इतकी अमनुष मारहाण करणे चुकीचे आहे. असे करू नका, असे आवाहन प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी केले आहे. याप्ररकणी तक्रार दाखल करायला गेलेल्या प्यार फाउंडेशनच्या सदस्यांना दुपारी ४ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत शहर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. मात्र, सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रात्री ११ वाजता संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांच्या या भूमिकेवरही प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
वाढत्या तापमानामुळे सावलीचा शोध
मागील काही दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान ४४ अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे, प्रत्येक जीव उन्हापासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. मोकाट प्राणी त्रास देतात म्हणून मारहाण करणे चुकीचे आहे. मुक्या, मोकाट प्राण्यांना त्रास देऊ नका, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांना जगू द्या, असे आवाहन प्यार फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापेल्ली यांनी केले आहे.
श्वान ऑक्सिजनवर
बेदम मारहाण केलेल्या कुत्र्यावर फाउंडेशनमध्ये नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या त्याला ऑक्सिजन लावण्यात आले आहे. सध्या प्रकृती सुधारत असल्याचे प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.