धानाची रखवाली करायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 08:31 PM2022-10-22T20:31:33+5:302022-10-22T20:32:07+5:30
Chandrapur News आपल्या शेतातील धानाची रखवाली करण्यासाठी जंगलालगत असलेल्या आपल्या शेतावर शेतकरी गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले.
चंद्रपूर: ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली( बोडधा) येथील शेतकरी हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील धानाची रखवाली करण्यासाठी जंगलालगत असलेल्या आपल्या शेतावर गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
सदाशिव रावजी उंदीरवाडे (७०, रा. कुडेसावली) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे, ब्रह्मपुरी तालुक्यातील याच परिसरातील वाघ हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी हळदा येथील एका महिलेला वाघाने शेतावर ठार केले होते. ही घटना ताजी असतानाच कुडेसावली परिसरात सदाशिव उंदीरवाडे यांनावर वाघाने हल्ला करून ठार केले. यामुळे परिसरात वाघाची दहशत पसरलेली आहे. आता धान कापणीचा हंगाम सुरू आहे. रोजच वाघाचे हल्ले दिवाळीच्या तोंडावर होत आहेत. त्यामुळे हळदा, कुडेसावली या परिसरात दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले असून, परिसरात दिवाळी असतानाही उत्साहाऐवजी दहशत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सतत होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे या नरभक्षी वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.