धान कापताना अचानक समोर आला वाघ अन्...; शिवटेकडी परिसरातील थरारक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 03:32 PM2022-11-09T15:32:09+5:302022-11-09T15:40:35+5:30

समोर भलामोठा वाघ बघताच, महिलांची मोठी तारांबळ उडाली

a tiger suddenly appeared in front of women while cutting paddy, Thrilling incident in Shiv Tekdi area | धान कापताना अचानक समोर आला वाघ अन्...; शिवटेकडी परिसरातील थरारक घटना

धान कापताना अचानक समोर आला वाघ अन्...; शिवटेकडी परिसरातील थरारक घटना

Next

नवरगाव (चंद्रपूर) : धान कापण्यासाठी नवरगाव येथील महिला सकाळी शिवटेकडी परिसरात गेल्या. धान कापत असतानाच, अचानक त्या महिलांसमोर पट्टेदार वाघ आला अन् त्या महिलाची पळताभुई झाली. काही वेळानंतर वाघ परत गेल्यावर नागरिकांच्या उपस्थितीत धानाची कापणी करण्यात आली.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगांव अंतर्गत रत्नापूर बिटातील शिवटेकडी परिसरातील हुमन कॉलनीलगत शंकर आंबोरकर यांच्या शेतात सोमवारी धान कापण्यासाठी सकाळी दहा महिला गेल्या. धान कापत असताना अचानक पट्टेदार वाघाने महिलांच्या समोर आला अन् आरोळी दिली. समोर भलामोठा वाघ बघताच, महिलांची मोठी तारांबळ उडाली. ओरडावे की पळावे, असे कुणाला काहीच सुचेना.

दरम्यान, महिला सैरावैरा पळाल्या. दहापैकी सहा महिला कशाबशा चार किमी अंतर कापून नवरगांवला पोहोचल्या, तर दोन महिला तिकडेच गायब झाल्याने त्यांना वाघाने मारल्याची वार्ता गावात येऊन सांगितली. काहींनी वनविभागालाही कळविले. शेवटी त्या महिलांना शोधण्यासाठी क्षेत्रसहायक एस.बी. उसेंडी, वनरक्षक जे.एस. वैद्य व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध सुरू केला. दोन महिला शेतातील धानपिकातून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळतपळत काही अंतर कापून शेतशिवारामध्ये सुखरूप आढळल्याने वनविभागाने व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

बराच वेळ त्या पट्टेदार वाघाला हाकलण्याचा प्रयत्न झाला. मात्र, धान कापणी करायची असल्याने घाबरलेल्या महिलांची हिंमतच होईना. शेवटी बरेच नागरिक शेतावर उभे राहिले आणि वाघाच्या दहशतीत धानाची कापणी करण्यात आली. या घटनेमुळे दहशत पसरली आहे.

शिवटेकडी परिसरात वाढली झुडपे

शिवटेकडीवर देवस्थान असून, परिसरात झुडपे वाढली आहेत, शिवाय पायथ्याशी हुमन प्रकल्पाची कॉलनी व कार्यालय आहे. अलीकडे या कॉलनीत कुणीही निवासी राहात नाही, परंतु दिवसभर एक-दोन कर्मचारी असतात. वाढलेल्या झुडुपांचा फायदा घेऊन बिबट व पट्टेदार वाघाचे वास्तव्य मागील अनेक महिन्यांपासून या भागात असल्याने शेतीची कामे कशी करावी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

Web Title: a tiger suddenly appeared in front of women while cutting paddy, Thrilling incident in Shiv Tekdi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.