'पैनगंगा' नदीवरील पूल तयार होऊन दीड वर्ष लोटले; पण लोकार्पण केव्हा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:16 IST2024-12-24T14:14:46+5:302024-12-24T14:16:10+5:30
प्रशासनाने लक्ष द्यावे: २१ किमीचे अंतर होणार कमी

A year and a half has passed since the bridge over the 'Painganga' river was completed; but when will it be inaugurated?
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, कोरपना तालुक्यातील पारडी ते झरी व खातेरादरम्यानच्या नदी घाटावर पुलाची निर्मिती झाली. याला दीड वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला. मात्र, या पुलाचे उद्घाटन, पुलाच्या साइडिंगचे डांबरीकरण, खातेरा गावातील वळण रस्ता आदी कामे प्रलंबितच आहे. त्यामुळे ही कामे कधी होणार, असा सवाल दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषा असलेल्या, पैनगंगा नदीवरील हा चौथा मोठा पूल आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी व वणी या दोन तालुक्यांची, चंद्रपूर जिल्ह्यातील एकट्या कोरपना तालुक्याची सीमा या नदीला लागली आहे. कोडशी खु, वनोजा, विरूर पुलानंतर या पुलाच्या निर्मितीचे काम आता पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे कोरपना ते मुकुटबन या दोन्ही शहरांना जाण्या-येण्याचा कमी अंतरात प्रवास सुलभ झाला आहे. विशेष म्हणजे कोडशी खु., वनोजा पुलाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर, विरूर पुलाची निर्मिती डब्लूसीएल, तर या नवनिर्मित पुलाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाच्या माध्यमातून झाली आहे; परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुलाचे लोकार्पण होणे अपेक्षित असताना ते आजतागायत झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे.
पुन्हा किमान दोन पुलांची गरज
कोरपना तालुक्यातील गांधीनगर-तेजापूर, भारोसा-जुगाद या दोन पैनगंगा नदीघाटावर पुलाची नितांत आवश्यकता आहे. या मार्गावर पुलाची निर्मिती झाल्यास दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना पुन्हा रहदारीसाठी कमी अंतरात जाणे येणे सोपे होईल.