आला रे आला बाप्पा आला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:30+5:302021-09-10T04:34:30+5:30
कोरोना महामारीपूर्वी जिल्ह्यात पाच हजारपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा व्हायचा. कोरोनामुळे ही संख्या घटली. सार्वजनिक मंडळांना ४ ...
कोरोना महामारीपूर्वी जिल्ह्यात पाच हजारपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे गणेशोत्सव साजरा व्हायचा. कोरोनामुळे ही संख्या घटली. सार्वजनिक मंडळांना ४ फूट व घरगुती गणपती मूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा आहे. गर्दी जमवणाऱ्या कार्यक्रमांना मनाई करण्यात आली. चंद्रपूर मनपा हद्दीत पीओपी मूर्तीवर पूर्णत: बंदी आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा, यासाठी निर्माल्य कलश व कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आली आहेत. शहरात पीओपी मूर्ती निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी चार दिवसांपूर्वीच मनपा पथकाने मूर्ती विक्रेत्या दुकानांची तपासणी केली. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून ते विसर्जनापर्यंत उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे, यासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे.
गोल बाजारात खरेदीसाठी गर्दी
पूजा व सजावटीचे साहित्य, मखर, विद्युत माळा आदी खरेदीसाठी नागरिकांची गुरुवारी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये गर्दी झालेली पाहायला मिळाली. काहीजण बुधवारीच गणरायाला घरी घेऊन गेले. यंदाही वाजत-गाजत गणरायाला घरी नेण्याचे टाळण्यात आले. साध्या पद्धतीनेच गणरायाची मूर्ती घरी आणली. सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री, पेढे, मोदक आदी साहित्य खरेदीसाठी गुरुवारी गोल बाजारात प्रचंड गर्दी झाली होती.
पर्यावरणपूरक मंडळांना पुरस्कार
कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन व्हावे, यासाठी पोलीस विभाग, मूर्तिकार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, स्वच्छता निरीक्षकांचे संयुक्त पथक गठित केले आहे. दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त व दोन वर्षे बंदीसह कारवाई केली जाईल. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना व मंडळांचा मनपा प्रमाणपत्र देऊन सत्कार करणार आहे.
बॉक्स
पर्यावरणपूरक गणेश मंडळांना पुरस्कार
मूर्ती शाडूची व पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. घरी शक्य नसल्यास मनपाच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना मनपाकडून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
अशी आहेत कृत्रिम विसर्जन कुंड
झोन क्रमांक - १
१) मनपा झोन कार्यालय, संजय गांधी मार्केट
२) बाबा आमटे अभ्यासिका
३) दाताळा रोड, इरई नदी
४) तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर)
झोन क्रमांक - २
१) गांधी चौक
२) लोकमान्य टिळक शाळा, पठाणपुरा मार्ग
३) शिवाजी चौक, अंचलेश्वर रोड
४) विठोबा खिडकी, विठ्ठल मंदिर वार्ड
५) रामाळा तलाव
६) हनुमान खिडकी
७) महाकाली प्राथ. शाळा, महाकाली वार्ड
झोन क्रमांक - ३
१) नटराज टॉकीज (ताडोबा मार्ग)
२) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा, बाबूपेठ
३) मनपा झोन कार्यालय, मूल मार्ग
४) बंगाली कॅम्प चौक