अबब ! एका हेक्टरात ४१ क्विंटल हरभरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:19+5:302021-06-27T04:19:19+5:30
देवरावची कमाल : पीक स्पर्धेत पटकाविला राज्यातून तिसरा क्रमांक नीलेश झाडे गोंडपिपरी : त्यांच्याकडे कृषी पदविका नाही. तंत्र, यंत्राची ...
देवरावची कमाल : पीक स्पर्धेत पटकाविला राज्यातून तिसरा क्रमांक
नीलेश झाडे
गोंडपिपरी : त्यांच्याकडे कृषी पदविका नाही. तंत्र, यंत्राची धड माहिती नाही. मात्र त्यांनी कमाल केली. एका हेक्टरात तब्बल ४१ क्विंटल हरभऱ्याचे पीक घेतले. राज्य पातळीवरील रब्बी हंगाम पीक स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक पटकविला. त्या शेतकऱ्याचे नाव आहे देवराव कोंदुजी शेडमाके. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या डोंगरगाव या खेडेगावातील ते रहिवासी आहेत.
निसर्गाचा लहरीपणाचा फटका शेतीला बसत आहे. त्यामुळे शेतीकडे अनेकांनी पाठ फिरविली. अशात गोंडपिपरी तालुक्यातील लहानसे खेडगाव असलेल्या डोंगरगावातून कृषी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी मिळाली. गोंडपिपरी या मागासलेल्या तालुक्यातील डोंगरगावात आदिवासी बांधवांची मोठी वस्ती आहे. शेती आणि मजुरी हा येथील मुख्य व्यवसाय.
देवराव शेडमाके यांच्या वडिलाकडे पाच एकर शेत जमीन आहे. या जमिनीत ज्वारी, सोयाबिन, कापूस, हरभराचे पीक ते घ्यायचे. पारंपरिक पध्दतीने शेती ते करायचे. निसर्गाचा लहरीपणा आणि कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांच्या माहितीअभावी शेतीतून फार कमी नफा मिळायचा.
बॉक्स
सूत्रे हाती घेताच आधुनिक शेती
देवरावने शेतीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. आधुनिक शेतीला प्राधान्य दिले. त्यासोबतच कृषी विभागाचे मार्गदर्शन घेणे सुरू केले. सिंचनाचा व्यवस्थेसाठी शेतात विहीर खोदली. तुषार सिंचन लावले. शेण खताचा वापर केला. सन २००७-८ मध्ये एका एकरात ३७ क्विंटल कापूस पिकविला. यावर्षी रब्बी हंगामात देवराव यांनी एक हेक्टरमध्ये हरभरा पेरला. या दरम्यान कृषी सहायक कल्पना चौधरी यांनी कृषी विभागाने सुरू केलेल्या पीक स्पर्धेची माहिती दिली. राज्य पातळीवरील रब्बी हंगाम पीक स्पर्धेतील आदिवासी गटातून देवरावने अर्ज भरला. शेतीकामात देवराव शेडमाके यांना पत्नी शोभा, मुलगा विवेक, मुलगी सुप्रिया यांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. एका हेक्टरात तब्बल ४१ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाले. राज्य पातळीवर एका हेक्टरात हरभरा पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेणारा देवराव शेडमाके तिसरा ठरला. पीक स्पर्धेचे तिसरे बक्षीस जाहीर झाले. मुंबईमध्ये होणाऱ्या सोहळ्यात बक्षीस वितरण होणार आहे.
कोट
शेती हा माझा आवडता विषय आहे. पिके घेताना नवेनवे प्रयोग मी करीत असतो. कृषी विभागामुळे मला आधुनिक शेती कळली. मला मिळालेल्या यशात माझा परिवार आणि कृषी विभागाचा मोलाचा वाटा आहे.
-देवराव शेडमाके, शेतकरी, डोंगरगाव