अबब ! ऐेंशी वर्षीय वृद्ध चालवतो सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:19+5:302021-08-24T04:32:19+5:30
कोरपना : दिवसेंदिवस सभोवतालचे दूषित होणारे वातावरण व रासायनिक पदार्थांच्या अतिवापराने माणसाचे वयोमान कमी झाले आहे. त्यातही आजच्या धकाधकीच्या ...
कोरपना : दिवसेंदिवस सभोवतालचे दूषित होणारे वातावरण व रासायनिक पदार्थांच्या अतिवापराने माणसाचे वयोमान कमी झाले आहे. त्यातही आजच्या धकाधकीच्या युगात मानवाला उतारवयात विविध व्याधींनी ग्रासले आहे. मात्र, तो ऐंशी वर्षांचा वृद्ध तरुणाला लाजवेल, अशाप्रकारे रस्त्यावर सायकल चालवून निरोगी आयुष्याचा व पर्यावरण रक्षणाचा खरा मूलमंत्र देत आहे.
तात्याजी माधवराव उलमाले हे कोरपना तालुक्यातील वनसडी गावचे रहिवासी. ते प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आहेत. १९४९ पासून त्यांनी सायकल चालविण्यास सुरुवात केली, ती आजतागायत अविरतपणे सुरू आहे. लहान वयात माता रोगाची लागण झाल्यानंतर त्यांना आजतागायत कुठल्याही आजाराने पछाडले नाही. नियमित व्यायाम म्हणून सायकल चालवणे हेच त्यांच्या निरोगी आयुष्याचे रहस्य असल्याचे मत त्यांनी लोकमतला सांगितले.
या आधुनिक काळात नागरिक थोड्या-थोडक्या कामासाठी मोटारसायकलीचा वापर करतात. त्यातही पेट्रोल, डिझेलचे भाव कडाडलेले आहेत. तात्याजी उलमाले यांची दैनंदिनी या उतारवयातही सायकलने सुरू होते. सायकलच्या वापरामुळे शरीराचे रक्ताभिसरण क्रिया व रोगप्रतिकारशक्तीत वाढ होते, असे ते सांगतात. शरीराला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा, चरबी कमी होणे, पचनक्रिया सुधारणे यांसारखे सकारात्मक परिणाम होत असून, सायकलचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
उलमाले हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असून, शेतीवरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. त्यांना चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. १९६३ मध्ये त्यांनी सर्वप्रथम शिक्षक म्हणून तीस रुपये वेतनावर नोकरी केली. एक वर्ष निमणी गावचे पोलीस पाटील म्हणून धुरा वाहिली. त्यानंतर एक वर्ष अंतरगाव येथे पोस्ट मास्तर म्हणूनही काम केले. यानंतर मात्र शेती या पारंपरिक व्यवसायात ते रमले. नियमित सायकलच्या वापरामुळे पर्यावरणपूरक आयुष्य जगता येत असून, आपल्या सुदृढ आरोग्याचा हाच मूलमंत्र असल्याचे ते सांगतात. तरुणांनाही लाजवेल, असे निरोगी आयुष्य ते जगत आहेत, हे विशेष.