अबब! .. सावली पंचायत समितीत ४६ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:32 AM2021-09-14T04:32:59+5:302021-09-14T04:32:59+5:30
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सावली पंचायत समितीच्या लेखापरीक्षण अहवालात अनेक वरिष्ठ अधिकारीही अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सन २०१६-१७ ...
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सावली पंचायत समितीच्या लेखापरीक्षण अहवालात अनेक वरिष्ठ अधिकारीही अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सन २०१६-१७ या कालावधीत तब्बल ४६ लाखांपेक्षा जास्त रुपयांचा अपहार झाल्याचे म्हटले आहे. सन २०१३ ते १८ जून २०१७ पर्यंतचा लेखापरीक्षण अहवाल अजूनही प्राप्त व्हायचा आहे. उपरोक्त अहवाल प्राप्त झाल्यास कोट्यवधी रुपयांचा अपहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सावली पंचायत समिती सावलीचे तत्कालीन कनिष्ठ सहायक प्रज्ञावंत रामटेके यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर शाखा सावलीच्या वैयक्तिक खाते क्रमांक १०३११७०१०१००७१ यामध्ये संपूर्ण रक्कम वळती केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.
असा झाला घोळ
जि. प. हायस्कूल पाथरी व निमगाव येथील कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी २०१५ च्या वेतनामधून केलेल्या विविध कपातीची रक्कम १ लाख ८४ हजार ९७२ रुपये, दिनांक १६ डिसेंबर २०१३ ते ८ मार्च २०१६ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या वजातीची रक्कम १९ लाख ११ हजार ८२८ रुपये तर दिनांक २३ जानेवारी २०१४ ते २९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत जमा केलेल्या नगदी प्राप्त रकमा २५ लक्ष ५५ हजार ५४ रुपये असा एकूण ४६ लाख ५१ हजार ८५४ रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख अहवालात आहे.
कोट
घोळ कोट्यवधीत जाण्याची शक्यता
फेब्रुवारी २०२१ मध्ये संबंधित अपहाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्याचा लेखापरीक्षण अहवाल दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाला. परंतु अपहाराची रक्कम २५ लाख रुपयांच्या वर असल्याने यार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे. ४६ लक्ष रुपयांपेक्षा जास्त अपहार झालेला असून कोट्यवधी रुपयांपर्यंत आकडा फुगण्याची शक्यता आहे.
- रोशन शिरसाट, ठाणेदार पोलीस ठाणे, सावली.