थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी अभय योजना
By admin | Published: October 6, 2016 01:32 AM2016-10-06T01:32:49+5:302016-10-06T01:32:49+5:30
प्रत्येकाला विजेची गरज नित्याची झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे वीज पुरवठा आहे. मात्र अनेक ग्राहक वीज वापरतात.
थकबाकीमुक्त व्हा : १ नोव्हेंबरपासून करणार अंमलबजावणी
राजकुमार चुनारकर चिमूर
प्रत्येकाला विजेची गरज नित्याची झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे वीज पुरवठा आहे. मात्र अनेक ग्राहक वीज वापरतात. मात्र वीज बिलाचा भरणा करीत नाही. त्यामुळे महावितरणची वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असून हा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहचला आहे. ही थकबाकी वसूल व्हावी व ग्राहकांनाही थकबाकीतून मुक्ती मिळावी, या उद्देशाने महावितरणकडून थकीत वीज बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकासाठी अभय योजना राबविली जाणार आहे. या योजनेमुळे थकबाकीमुक्त होण्याची वीज ग्राहकांना संधी मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत थकबाकीदाराला व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येऊन केवळ मुद्दल रक्कम भरावी लागणार आहे. कृषी व पाणीपुरवठा योजना वगळता राज्यातील सर्वच प्रकारच्या थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी असलेली ही योजना १ नोव्हेंबर २०१६ पासून सुरु होणार असून ती सहा महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे.
अनेक महिने वीज देयकांची रक्कम न भरल्यामुळे थकबाकीदार झालेल्या ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. राज्यात असे अनेक ग्राहक असून अशा ग्राहकांना आता पुन्हा एकदा ‘अभय’ योजने अंतर्गत मुख्य प्रवाहात सामावून घेवून त्याचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. राज्यातून एकूण ३८ लाख थकबाकीदार वीज ग्राहकांना अभय योजनेचा लाभ होऊ शकतो. याबाबत २७ सप्टेंबरला परिपत्रक जारी करण्यात आले आहे. परिपत्रकानुसार ३१ मार्च २०१६ पूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. या योजने अंतर्गत येत्या नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत वीज ग्राहकांना मुद्दल रक्कम भरुन वीज पुरवठा पूर्ववत करता येणार आहे.