'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रमासाठी जिल्ह्यातून सुमारे १ हजार ८०० अंतिम निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 03:51 PM2024-09-10T15:51:10+5:302024-09-10T15:51:37+5:30
Chandrapur : अर्जाची मुदत १३ सप्टेंबरपर्यंत वाढविली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रमासाठी जिल्ह्यातून सुमारे १ हजार ८०० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना शासनाकडून दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात येईल. त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांनी नोंदणी करावी, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे.
योजनादुताच्या निवडीसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगट इतकी आहे. उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा, त्याला संगणकज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाइल असावा. उमेद्वार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असले पाहिजे. योजनादूत निवडीसाठी ऑनलाइन अर्ज करावा.
आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबत प्रमाणपत्र, अधिवास दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व हमीपत्र (ऑनलाइन अर्जासोबतच्या नमुन्यात) सादर करावे लागणार आहे.
अशी असेल कार्यपद्धती
- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्षमार्फत हा उपक्रम राबविण्यात येईल. कार्यरत प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी योजनादूत नेमले जातील.
- ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचाय- तीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात राज्यात एकूण ५० हजार योजनादुतांची निवड होणार आहे.
- मुख्यमंत्री योजनादुतास प्रत्येकी १० हजार प्रतिमहिना एवढे मानधन देण्यात येणार आहे. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादुता- सोबत सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे.