ट्रॅव्हल्सद्वारे पुण्याहून चंद्रपुरात आलेले सुमारे ३०० जण थर्मल स्क्रिनिंगविना घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:52 PM2020-03-23T12:52:39+5:302020-03-23T12:53:03+5:30
रविवारी जनता कर्फ्यू असताना खासगी ट्रॅव्हल्सने सुमारे ३०० जण पुण्यासह अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात परतले. या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधणे गरजेचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणूमुळे स्वजिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानक किंवा बसस्थानकावर थर्मल स्क्रिनिंग करुन घरी पाठविण्यात येत आहे. मात्र रविवारी जनता कर्फ्यू असताना खासगी ट्रॅव्हल्सने सुमारे ३०० जण पुण्यासह अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात परतले. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधणे गरजेचे होते. मात्र त्यांना बसथांब्यावर उतरवून घरी जावू दिले. यामध्ये कोणी कोरोना बधित असल्यास धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब लक्षात येताच सोमवारपासून चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या पडोली फाट्यावर उपप्रादशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पुढाकारात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात येणाºया प्रवाशांची थर्मल स्क्रिनिग करण्यात येत आहे. शनिवारी तबब्ल १०८५ नागरिक रेल्वे गाडीने पुण्यातून चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहचले होते. या प्रत्येकांची नोंद घेण्यात आली. तसेच त्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातावर शिक्के मारले गेले. रविवारी सकाळापसून पुण्याहून ८ ते १० खाजगी ट्रॅव्हल्समधून किमान ३०० विद्यार्थी-प्रवासी शहरात दाखल झाले. त्यांची थर्मल स्क्रिनिंग तर झालीच नाही. शिवाय त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले नाही.
खासगी वाहनाने शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सोमवारपासून खासगी वाहनाने शहरात येणाऱ्या प्रवाशांची शहर दाखल होण्यापूर्वीच येत असलेल्या पडोली फाट्यावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.
- निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.