जिल्हा परिषदेचे ५४ कोटी अखर्चित

By admin | Published: April 11, 2015 12:53 AM2015-04-11T00:53:18+5:302015-04-11T00:53:18+5:30

शासनाकडून निधी मिळत नसल्याच्या थापा मारत विकास कामांना ब्रेक देणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बिंग फुटले आहे.

About 54 million newspapers of Zilla Parishad | जिल्हा परिषदेचे ५४ कोटी अखर्चित

जिल्हा परिषदेचे ५४ कोटी अखर्चित

Next

विकास कामे ठप्प : निधी नसल्याची बोंब ; प्रत्यक्षात मात्र कामेच नाही
चंद्रपूर :
शासनाकडून निधी मिळत नसल्याच्या थापा मारत विकास कामांना ब्रेक देणाऱ्या चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बिंग फुटले आहे. २०१४-१५ या वित्तीय वर्षात तब्बल ५३ कोटी ९७ लाख ४७ हजार रूपयाचा निधी अर्खीत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी झालेल्या वित्त समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी बांधकामावर किती निधी खर्च झाला, याची माहिती विचारली असता, ही माहिती समोर आली आहे.
अच्छे दिनचे दिवास्वप्न दाखवत भाजप पदाधिकारी सत्तेच्या बोहल्यावर चढल्यानंतर प्रत्यक्षात मात्र चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी अखर्चीत ठेवल्याने जिल्हा परिषदेला बुरे दिन आले आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाचे विनोद अहिरकर व सतिश वारजूकर या जि.प. सदस्यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सुरु असताना २०१४-१५ या वित्तीय वर्षात बांधकामावरील किती निधी अखर्चीत आहे, याची माहिती विनोद अहीरकर यांनी सभागृहाला मागितली. त्यानंतर देण्यात आलेल्या माहितीत अखर्चीत निधीचा आकडा पाहता संपूर्ण सभागृह संतप्त झाले. बांधकामासाठी निधी नाही, अशी सतत ओरड होत असताना प्रत्यक्षात मात्र आलेला निधी वेळीच वापरता आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक विकास कामे झालेली नाही, असा आरोप विनोद अहिरकर व सतिश वारजूकर यांनी केला आहे.
राज्याचे अर्थ व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विश्वस्त असलेले देवराव भोंगळे हे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आहेत. मात्र त्यांनी प्रत्यक्षात कोट्यवधी रूपयांचा निधी अखर्चीत ठेऊन आपली अकार्यक्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांना उत्तर देताना भोंगळे यांची पंचाईत होत आहे.
५४ कोटींचा निधी अखर्चीत असताना देवराव भोंगळे यांनी मात्र परिक्षेत्रात कामे मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना निधी नाही, शासनाकडे पत्रव्यवहार सुरु आहे. निधी मिळाला की कामे देऊ अशा थापा मारल्या. मात्र आलेल्या निधीचे साधे नियोजन सुद्धा त्यांना करता आले नाही. त्यामुळे ५४ कोटींचा निधी अखर्चीत राहिला, असे जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर व सतिश वारजूकर यांनी म्हटले आहे.
एकीकडे राज्याचे वित्त मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याकरिता जादा निधीची तरतुद करीत आहेत. मात्र त्याचाच पक्षाचे जबाबदार सभापती निधी अखर्चीत ठेवत असल्याने जिल्ह्यात विकास कामांना खिळ बसल्याचे अहीरकर व वारजूकर यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाव्यतीरिक्त इतरही विभागात निधी अखर्चीत आहे. त्यामुळे विकास काम होऊ शकलेले नाही. यासंदर्भात बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)

देवराव भोंगळे यांनी राजीनामा द्यावा
निधी नाही अशा थापा मारत शासनाकडून मिळालेला ५४ कोटींचा निधी अखर्चीत ठेवणारे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर व विनोद अहिरकर यांनी केली आहे. सुरुवातीच्या काळात देवराव भोंगळे यांचा आव पाहता जिल्हा परिषदेच्या विकासात ते महत्त्वाची भूमिका बजावतील असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यांच्यासारखा खराब कार्यकाळ यापूर्वीच्या कोणत्याच बांधकाम सभापतीचा राहिला नाही, असा आरोपही विनोद अहीरकर व सतिश वारजूकर यांनी केला आहे.

Web Title: About 54 million newspapers of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.