अबब! प्रवास भत्त्यावर १० लाखांचा खर्च
By admin | Published: February 23, 2016 12:32 AM2016-02-23T00:32:22+5:302016-02-23T00:32:22+5:30
पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून जनहिताच्या विविध योजना राबविल्या जात आहे.
पंचायत समिती सभापती व उपसभापती : घरभाडे व मानधनावरही लाखोंचा खर्च
चंद्रपूर : पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून जनहिताच्या विविध योजना राबविल्या जात आहे. यासाठी शासनाकडून लाखोंचा निधी मिळत असते. मात्र पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या प्रवास भत्त्यावर तसेच मानधन, घरभाडे व इतर खर्चावरच अर्धा अधिक निधी खर्च होत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या वार्षिक अहवालातून समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या वार्षिक अहवालानुसार जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींसाठी प्रवास भत्त्याच्या स्वरूपात २०१४-१५ या वर्षात ९ लाख ६ हजार ८८१ रूपयांचा खर्च झाला आहे. तर घरभाडे व इतर खर्चाच्या स्वरूपात २ लाख ९५ हजार ८०५ रूपये तसेच मानधनासाठी ३१ लाख ६६ हजार ९३९ रूपये खर्च झाले आहे, असे नमुद आहे. पंचायत समिती सभापतीसाठी निवासस्थान व वाहन असते. तर उपसभापतीलाही काही सुविधा दिलेल्या आहेत. मात्र याव्यतीरिक्तही प्रवास भत्त्याच्या स्वरूपात दरवर्षी ९ ते १० लाख रूपये खर्च करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. त्यामुळे शासनाकडून मिळालेल्या निधीतून किंवा पंचायत समितीच्या मिळणाऱ्या निधीतून हा खर्च केला जात असल्याने विकास कामांवर निश्चीतच परिणाम पडत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)