सुविधांअभावी गडचांदूर रूग्णालय सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:42 PM2018-03-04T23:42:07+5:302018-03-04T23:42:07+5:30
कोरपना, जिवती तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात.
आॅनलाईन लोकमत
गडचांदूर : कोरपना, जिवती तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात शेकडो रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयातील विविध समस्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डॉक्टरांची व इतर पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य सेवा सलाईनवर असल्याचे दिसून येते.
रुग्णालयासाठी महत्त्वपूर्ण असलेले वैद्यकीय अधीक्षकचे पद अजूनही भरले नाही. वैद्यकीय अधिकाºयाचेही दोन पदे रिक्त असून केवळ एकच पद भरले आहे. येथे डॉ. धर्मेद्र सुलभेवार कार्यरत असून त्यांना सुद्धा डेप्युटेशनवर पाठविले आहे. येथे कार्यरत डॉ. विजय कळसकर यांना कोरपना येथे डेप्युटेशनवर पाठविले असून आयुषमध्ये डॉ. सय्यद जुबेर, आयुर्वेदीकचे डॉ. अनिल घुले व होमिओपॅथीचे डॉ. अश्विनी येडे व प्रणाली लांजेवार कार्यरत आहे.
स्टाफ नर्सच्या एकूण सात पदापैकी केवळ चार पदे भरली असून तीन पदे रिक्त आहेत. ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्ण कोरपना-जिवती तालुक्यातून उपचारासाठी येथे येतात. मात्र या रुग्णांना पुरेशी वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे. ५० बेडची क्षमता निर्माण करण्यासंबंधी प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. मात्र वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन होणे गरजेचे आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. या ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन आहे. मात्र, एक्सरे तंत्रज्ञ नसल्यामुळे ही मशिन धूळ खात पडली आहे. एक्सरेसाठी रुग्णांना बाहेर जावे लागते. सोनोग्राफी मशिन नसल्याने त्यासाठी सुद्धा बाहेर जावे लागते. यामुळे गरीब रुग्णांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथील रिक्त पदे त्वरीत भरणे गरजेचे असून याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूलाच एनसीडी विभागाचे कार्यालय आहे. तेथेच वैद्यकीय अधीक्षकचे कार्यालय असून या कार्यालयाची दुर्दशा झाली आहे, अशा अनेक समस्या या रूग्णालयात आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासनाने येथील समस्यांची दखल घेत रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे.
गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दररोज ३०० च्या जवळपास रुग्ण येतात. त्यामुळे सध्याचे बेड अपूरे पडत असल्याने ५० बेडची क्षमता करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे आवश्यक आहे.
- डॉ. धर्मेद्र सुलमेवार, वैद्यकीय अधीक्षक,
ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर.
तालुक्याच्या दर्जाचे असलेले औद्योगिक शहर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयाची दुर्दशा बघता रिक्त पदे त्वरीत भरणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची वैद्यकीय सेवेची गरज भागविताना शासन आरोग्य सेवेवर करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र त्याचा लाभ योग्यरित्या मिळताना दिसत नाही.
- सुभाष धोटे, माजी आमदार राजुरा
गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा आरोग्य मंत्री यांच्याकडे निवेदन दिले आहे. आ. धोटे याबाबत पाठपुरावा करीत आहेत.
-सतीश उपलेंचवार, अध्यक्ष, भाजप गडचांदूर शहर.