सेवादासनगर शाळेत शिक्षकांचीच गैरहजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:42 AM2020-12-16T04:42:35+5:302020-12-16T04:42:35+5:30
जिवती : कोरोनाकाळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने आनलाईन शिक्षणप्रणाली सुरु केली आहे. मात्र अतिदुर्गम अशा ...
जिवती : कोरोनाकाळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने आनलाईन शिक्षणप्रणाली सुरु केली आहे. मात्र अतिदुर्गम अशा जिवती तालुक्यातील काही भागात शिक्षक दांडी मारत असल्याचे प्रकरण शालेय व्यवस्थापन समिती व केंद्रप्रमुख यांनी दिलेल्या भेटीदरम्यान उघडकीस आले आहे.
सोमवारी वणी केंद्राचे केंद्रप्रमुख सेवादासनगर येथील शाळेवर भेटीला गेले असता तेथील दोन्ही शिक्षक गैरहजर आढळून आले. दरम्यान गावातील शालेय व्यवस्थापन समितीचेही लोक तिथे पोहचले आणि शिक्षक गैरहजर असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे, असे पत्रही केंद्र प्रमुख यांना दिले आहे. शासनाने शाळा बंद ठेवल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सूर आहे. यासाठी संबंधित शाळेतील ५० टक्के शिक्षकाना रोज शाळेवर उपस्थित राहणे बंधनकारक असून रोटेशननुसार शिक्षकांच्या नेमणुका शाळेवर केल्या जात आहे. त्यानुसार जिवती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वणी केंद्रातील सेवादासनगर येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवर सोमवारला विषय शिक्षक अजीरजा शाबानअली अजाणी व सहायक शिक्षक वासुदेव कोडापे यांची ड्युटी होती मात्र केंद्रप्रमुख सेवादासनगर येथील शाळेवर भेटीसाठी गेले असता दोन्ही शिक्षक अनधिकृत गैरहजर आढळून आले त्यामुळे शाळाही बंद होती. दरम्यान यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव राठोड, सुशीला पवार, उद्धव राठोड, अनिता आडे आदी ग्रामस्थांनीही सदर दोन्ही शिक्षक अनियमित शाळेत येत असल्याची माहिती दिली आणि कारवाई करण्यात यावी यासंबंधात लेखी तक्रारही दिली. केंद्रप्रमुख चंदणखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषय संबंधित शिक्षण विभागाला कळविले असल्याचे सांगितले.