शिक्षकांचे कुटुंबासह अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:28+5:302021-06-06T04:21:28+5:30
चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील शाळा तुकड्यांना बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये रूपांतरीत करून नियमित वेतन अनुदान ...
चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील शाळा तुकड्यांना बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये रूपांतरीत करून नियमित वेतन अनुदान मंजूर करण्यात यावे, दरमहा १ तारखेला वेतन अदा करण्यात यावे, या मागणीच्या पूर्ततेसाठी कोविड-१९ साथरोगाच्या नियमाचे पालन करून शुक्रवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षकांनी कुटुंबासह एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले.
लेखाशिर्ष १९०१ अंतर्गत वेतन घेणाऱ्या आदिवासी उपयोजन क्षेत्रातील शाळेत/ तुकडीवर कार्यरत समस्याग्रस्त मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे झूम ॲपच्या माध्यमाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये वेतन नियमित होत नसल्याने अडचण भासत असून कार्यरत शिक्षक आमदार हा मुद्दा सोडविण्यास असमर्थ असल्याचे अनेकांनी विषद केले. त्यामुळे नोव्हेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघामधून संघटनेचा उमेदवार निवडून आणू असा, निर्धार व्यक्त करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद देशमुख, श्रीधर खेडीकर, वर्धा जिल्हयाचे कार्यवाह महेंद्र सालंकर, अध्यक्ष सुरेशकुमार बरे, मुख्याध्यापक दीपक बोकडे, अशोक कस्टी, नामदेव ठेंगणे, अनिल कंठीवार, प्रा. अनिल डहाके, ललिता वाघे, संतोष नन्नावार, प्रभाकर पारखी पुणे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, विठ्ठल हिंगाने आदी चर्चेत सहभागी झाले होते. प्रास्ताविक गडचिरोली जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, संचालन चंद्रपूर जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, आभार जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे यांनी मानले. माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.