ताडोबा बफरमध्ये फिरणाऱ्यांकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
By राजेश भोजेकर | Published: August 10, 2023 06:07 PM2023-08-10T18:07:04+5:302023-08-10T18:08:36+5:30
दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पच्या मोहर्ली प्रादेशिक वनक्षेत्रात प्रवेश करून वन कर्मचाऱ्याशी वाद घालणाऱ्या तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना मोबाईलवर शिवीगाळ करणाऱ्या वासुदेव ठाकरे, भद्रावती, अक्षय बंडावार, भद्रावती व सुबोध तिवारी, माजरी या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर या वनविभागा अंतर्गत मोहर्ली (प्रादे.) परिक्षेत्रात ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजताचे दरम्यान भद्रावती येथील रहिवासी असलेले वासुदेव ठाकरे, अक्षय बंडावार तथा सुबोध तिवार हे अडेगाव या गावामध्ये लाल रंगाच्या गाडीवर आले आहे. यावेळी तिघेही जंगलाच्या दिशेने जात होते. त्यावेळी वनकर्मचारी यांनी या तिघांना जंगल परिसरात फिरण्यास मनाई केली व आगरझरी मार्गे बाहेर निघण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला जंगलाच्या बाहेर काढले म्हणून रात्री १०.३९ वाजता मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना शिवीगाळ केली.
या प्रकरणाची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर दुर्गापूर पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे चौकशी करीत आहे.