इरई नदीकाठ सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा
By Admin | Published: September 29, 2016 12:52 AM2016-09-29T00:52:52+5:302016-09-29T00:52:52+5:30
परिपूर्ण आणि अचूक नियोजन, कामाचा उत्तम दर्जा आणि कामाची गती या त्रिसुत्रीवर इरई नदीकाठ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करून...
सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश : मुंबईत पर्यटन मंत्र्यांसोबत बैठक
चंद्रपूर : परिपूर्ण आणि अचूक नियोजन, कामाचा उत्तम दर्जा आणि कामाची गती या त्रिसुत्रीवर इरई नदीकाठ दोन्ही बाजूंनी एक किलोमीटर अंतरापर्यंत विकसित करून हे सौंदर्यीकरणाचे काम वेगाने पूर्ण करा, असे आदेश राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, आमदार प्रशांत बंब, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण संचालनालयामार्फत नदीकाठी २२ हजार झाडे लावण्यात यावीत. इरई नदी सौंदर्यीकरणाच्या कामास निधी उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, नदीकाठचे सौंदर्यीकरण करताना अशा स्वरूपाचे जगभरात झालेले उत्तम काम अभ्यासण्यात यावे व उत्तमातील उत्तम नियोजन करून नदी विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा, या कामास गती द्यावी, नदीकाठचे सौंदर्यीकरण करताना नदीपात्र विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही वित्तमंत्र्यांनी दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)
इरईवर होणार
होणार ९ बंधारे
इरई नदीवर ९ बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यात दाताळा पूलाचे बांधकाम लवकर करण्यात यावे, यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय मान्यता १५ दिवसात घेण्यात याव्यात, असे निर्देशही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.