शासनाकडून ‘कन्हाळगाव’ नव्या अभयारण्याच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:40+5:30
अधिक संख्येने वन्यजीव व दुर्मिळ प्राणी या भागात आढळतात. म्हणूनच सदर परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने आपली कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरातील नागरिकांचे वनविभागाकडून जनमत घेण्यात सुरुवात झाली असून जवळपास सर्वच गावातून या प्रकल्पासाठी विरोध दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्य होण्याबाबत शासनाकडून तत्वत: मान्यता प्राप्त झाली असून हालचालींना वेग आला आहे. मात्र कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याची पुढील कार्यवाही होण्यापूर्वी कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावकऱ्यांची मते घेणे आवश्यक असल्याचा निर्णय राज्यस्तरीय वन्यजीव बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या मतांवरच या अभयारण्याचे भवितव्य ठरणार आहे.
अभयारण्याबाबत नागरिकांची मते घेण्यासाठी प्रत्येक गावात विशेष सभा घेऊन गावकऱ्यांचे मत घेण्याची कार्यवाही सुरु आहे. कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्यात एकूण ३३ गावांचा समावेश असून ही गावे १८ ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन करुन सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन अध्यक्ष, ग्रामसेवक, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात येत आहे.
४ मार्च २०२० पासून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा बोलावून कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याबाबत गावकऱ्यांचे मत घेतली जात आहेत.
या सभेमध्ये सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) पी. जी. कोडापे, सहाय्यक व्यवस्थापक (एफडीसीएम) कोपीलवार, मेश्राम व संबधित वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करीत आहे. मध्यचांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व विभागीय व्यवस्थापक रेड्डी (एफडीसीएम) यांच्या मार्गदर्शनात सभा घेण्याची कार्यवाही सुरु आहे. दरम्यान, नागरिकांच्या मतांवरच या अभयारण्याचे भवितव्य ठरणार असल्याने नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यासाठी वनाधिकारी कसून प्रयत्न करीत आहेत. ज्या ठिकाणी सभा झाल्या, तिथे गावकºयांनी आपल्या मागण्या पुढे केल्या आहेत.
कन्हाळगाव अभयारण्यासाठी गावकऱ्यांचा विरोध
आक्सापूर : महाराष्ट्र-तेलंगाना सीमेवरील मध्यचांदा वनविभाग व वन प्रकल्पाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून लगतच्या ताडोबा प्रमाणेच पर्यटकांना येथील जंगलानेसुध्दा भुरळ घातली आहे. अधिक संख्येने वन्यजीव व दुर्मिळ प्राणी या भागात आढळतात. म्हणूनच सदर परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने आपली कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरातील नागरिकांचे वनविभागाकडून जनमत घेण्यात सुरुवात झाली असून जवळपास सर्वच गावातून या प्रकल्पासाठी विरोध दिसून येत आहे. यामुळे नवीन अभयारण्य निर्मितीसाठी अडचण निर्माण होणार आहे. या प्रस्तावित अभयारण्यात सर्वाधिक गोंडपिपरी तालुक्यातील गावे समाविष्ट आहेत बल्लारपूर व पोभुर्णा तालुक्यातील काही गावांचादेखील समावेश आहे. सभेमध्ये वनविभागाकडून अभयारण्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. अभयारण्यानंतरच्या नफा व तोट्याबाबत यावेळी चर्चा केली जात आहे. मात्र बहुतांश सभेमध्ये ग्रामस्थ या प्रस्तावाला विरोध करीत आहेत. गावकºयांनी अनेक मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतरच ग्रामस्थ आपला निर्णय बदलवायला तयार आहेत.
अशा आहेत मागण्या
शासनाने गावातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला अभयारण्यात रोजगार द्यावा, लोकांच्या लाकुडफाट्याची गरज पूर्ण करावी, जंगलावरील गावाचा हक्क कायम ठेवावा, तेंदुपता संकलन हंगाम बंद करू नये, वन्यजीवापासून शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी कडक उपाययोजना करावी, स्थानिकांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, अशा नागरिकांच्या मागण्या आहेत.