प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:42+5:30
मनपा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ०४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी १हजार ५९ अर्ज प्रात्र ठरले यापैकी ३०४ घरकुल बांधकाम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे योजनेतून शहरात ३०४ घरकूल बांधकाम सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी या योजनेला गती द्यावे, असे निर्देश महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
मनपा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ०४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत प्राप्त अर्जांपैकी १हजार ५९ अर्ज प्रात्र ठरले यापैकी ३०४ घरकुल बांधकाम सुरू आहे. उरलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर मालकी हक्काची कागदपत्रे, जमिनीचा स्थळदर्शक नकाशा, कर पावती, स्टॅम्प पेपर आदी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अर्जधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे, यासाठी केंद्र शासनाकडून महत्त्वाकांक्षी अशी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनला गती देण्याच्या दृष्टीने चंद्र्रपूर महानगर पालिकेतर्फे कागदपत्रांची पूर्तता केल्या जात आहे. त्यासाठी अर्जदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पालिका कर्मचाऱ्यांनी यापूर्वी काम केल्याची माहिती महापौर घोटेकर यांनी दिली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अडीच लाखांचे मिळणार अनुदान
शासनातर्फे मंजूर योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे अनेकदा कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. या योजनेतंर्गत घरकुलसाठी केंद्र शासनाकडून १ लाख ५० रूपये आणि राज्य शासनाकडून १ लाख असे एकून २ लाख ५० हजार रूपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे. घरकुलसाठी नकाशा काढणे तसेच बांधकाम मंजुरीसाठी कुठलाही खर्च लाभार्थ्यांना करण्याची गरज नाही. लाभार्थ्यांना संपूर्ण सुविधा पालिकेतर्फे पुरविण्यात येणार आहे. घरकूल बांधकामाच्या चार टप्यानुसार पाया, स्लॅब लेव्हल, स्लॅब पूर्ण व घर फिनिशिंगचे निरीक्षण करून त्यानुसार अनुदान देण्यात येणार आहे.