मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 12:53 AM2016-01-12T00:53:44+5:302016-01-12T00:53:44+5:30

सरपण गोळा करणे व इतर कामासाठी गेलेल्या महिला व पुरुषांवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याच्या घटना सतत घडत आहेत.

Access to prevent human-wildlife conflict | मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रवेशबंदी

मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रवेशबंदी

Next

वन्यप्राणी हल्ले वाढले : गावागावांत दवंडी व गस्तीत वाढ
मूल : सरपण गोळा करणे व इतर कामासाठी गेलेल्या महिला व पुरुषांवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यावर उपाय म्हणून वनविभागाने आता जंगलात प्रवेशबंदी लादण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गावागावांत दवंडी पिटली जात असून गस्तीतही वाढ करण्याचा प्रयत्न वनविभागाने चालविला आहे.
चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे व उपवनसंरक्षक संरक्षक आर.टी. धाबेकर यांच्या आदेशानुसार मूल तालुक्यातील राजोली क्षेत्रात प्रेशबंदीचा प्रयत्न करुन मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वनविभागाच्या अधिपत्याखाली असलेले वन दिवसेंदिवस कमी होत असल्याने तसेच जंगलातील वन्यप्राणी जे हिंस्र प्राण्यांना अन्न म्हणून हवे असते, ते दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे अन्नाच्या शोधात हिंस्र प्राणी वाघ, बिबट हे गावाशेजारी आश्रय घेत असल्याचे दिसून येत आहे. गावाशेजारी असलेल्या जंगलात सरपणासाठी असो की इतर कामासाठी महिला किंवा पुरुष गेला की दबा धरुन बसलेले हे वन्यप्राणी त्यांच्यावर हल्ला चढवितात. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कुटुंबातील कमावती व्यक्ती अशाप्रकारे मृत्यू पावल्याने कुटुंबांवरही आभाळ कोसळते. हे टाळण्यासाठी वनविभागाने राखीव वनाशेजारी असलेल्या गावागावात प्रवेशबंदी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासंदर्भात सर्व ग्रामपंचायतींना प्रवेशबंदीचे पत्र राजोली परिक्षेत्रात देण्यात आले आहे. तसेच या अधिनस्त असलेल्या वनरक्षक व वनमजुरामार्फतीने गावात दवंडी देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. जंगलात गस्तसुद्धा वाढविण्यात आली आहे. जंगलात ट्रॅप कॅमेरेसुद्धा वाढविण्यात आले असून जंगलात होणाऱ्या एकूण हालचालीवर करडी नजर वनविभागाने ठेवली आहे. वनविभागाने सर्व गावात हा उपक्रम राबविल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळता येऊन अनुचित घटनांवर आळा बसेल. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Access to prevent human-wildlife conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.