तृतीय वर्षात प्रवेश मिळण्याचा मार्ग झाला मोकळा; कॅरी-फॉरवर्डने मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:59 AM2024-09-11T11:59:19+5:302024-09-11T12:00:53+5:30
Chandrapur : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार कॅरी-फॉरवर्ड पद्धतीने प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅरी-फॉरवर्ड पद्धतीने प्रवेश मिळणार आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॅरिऑन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, यासंदर्भात सिनेट सदस्य विजय बदखल यांनी कुलगुरूंना निवेदन दिले होते.
गोंडवाना विद्यापीठाशी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महाविद्यालय संलग्नित आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षातील काही विषय शिल्लक आहे. मात्र, विद्यार्थी द्वितीय वर्षात उत्तीर्ण झाले आहे. पहिल्या वर्षातील काही विषयांमुळे त्यांना द्वितीय वर्ष उत्तीर्ण होऊनही तृतीय वर्षात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, आता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विजय खंडारे यांनी अधिसूचना काढली असून, यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. विशेष म्हणजे, ही सवलत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता लागू असल्याचेही अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.
चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबतही असेच घडले असून, त्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात येण्याची शक्यता होती. यासंदर्भात सिनेट सदस्य विजय बदखल यांनी कुलगुरूंकडे निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून कॅरिऑन देण्याची मागणी केली होती.
"विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांना कॅरिऑन देण्याची मागणी कुलगुरूंकडे केली होती. आता विद्यापीठाने निर्णय घेतल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. विद्यार्थ्यांनी कॅरी-फॉरवर्ड पद्धतीने प्रवेश मिळणार आहे."
- विजय बदखल, सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ