शेतकरी विमा अपघात योजनेलाच ‘अपघात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:29 AM2021-03-10T04:29:18+5:302021-03-10T04:29:18+5:30
चंद्रपूर : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी पाठविलेल्या १०१ प्रस्तावांपैकी केवळ ...
चंद्रपूर : अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी पाठविलेल्या १०१ प्रस्तावांपैकी केवळ ४२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. १८ प्रस्तावात त्रुटी असून ३६ प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित आहेत. तर ५ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थोर्य प्राप्त करुन देणाऱ्या या योजनेचाच अपघात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतात काम करीत असताना होणारे अपघात, संपदर्श, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारा मृत्यू, रस्ता अपघात, वाहन अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत देण्याच्या अनुषंगाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेतंर्गत सन २०१९-२०२० या वर्षात १०१ शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव सादर केले. यापैकी केवळ ४२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. पाच प्रस्ताव अपात्र ठरले. ३६ प्रस्ताव कंपनीकडे आहेत. तर १८ प्रस्तावात विविध त्रुटी आहेत. प्रस्ताव मंजुरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने या योजनेचाही शेतकऱ्यांना पाहीजे त्या प्रमाणात लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.
बॉक्स
कोणाला किती मिळते मदत
शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाल्यास दोन लाख रुपये, एक हात व एक पाय असे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख, एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपयांची मदत मिळत असते.
बॉक्स
सर्वाधिक प्रकरणे रोड अपघाताची
जिल्ह्यात दाखल झालेल्या १०१ प्रस्तावापैकी सर्वाधिक प्रकरणे रोड अपघाताची आहेत. प्रस्ताव सादर करीत असताना अनेक कागदपत्राची पूर्तता करावी लागते. त्यामुळे अनेक प्रस्तावात त्रुटी येतात. शेतकरी कुटुंबाशी विमा कंपनीद्वारे पत्रव्यवहार केला जातो. या योजनेसाठी १० डिसेंबरपर्यंतचा कालावधी गृहीत धरण्यात येतो. विमा संरक्षणापोटी राज्य शासनाच्या वतीने विमा कंपनीत शेतकऱ्यांचा विमा भरला जातो.
बॉक्स
२०२० साली मंजूर व प्रलंबित प्रकरणे
रस्ता अपघात २६
वन्यप्राणी अपघात १०
वीज पडून २
पाण्यात बुडून २१
उंचावरुन पडून २
विद्युत शॉक ९
विष प्राशन १
कोट
सध्यास्थितीत ४२ प्रस्ताव मंजूर झाले असून विविध कारणास्तव ५४ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणाबाबत पाठपुरावा सुरु आहे. दर आठवड्याला यासंदर्भात आढावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना त्रुटी पूर्तता करण्याच्या सुचना करण्यात येतात.
- उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर