माजरी येथील कुनाडा कोळसा खाणीत अपघात
By admin | Published: January 18, 2017 12:40 AM2017-01-18T00:40:26+5:302017-01-18T00:40:26+5:30
वेकोलि माजरीच्या कुनाडा कोळसा खाणीत कामगारांची वाहतूक करणारे वाहन वाट पाहात असलेल्या मजुराच्या....
एक गंभीर : एक जण किरकोळ जखमी
माजरी: वेकोलि माजरीच्या कुनाडा कोळसा खाणीत कामगारांची वाहतूक करणारे वाहन वाट पाहात असलेल्या मजुराच्या अंगावर चढल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा कामगार किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
राजू महतो (४०) रा. सलेमपूर (बिहार) असे जखमीचे नाव आहे. रात्रपाळीत कामाला गेलेल्या डेको कंपनीच्या कामगारांना आणण्याकरिता सोमवारी पहाटे ५ वाजता जेएच १० एआर ३५४० क्रमांकाचे वाहन खाणीत पोहचले. रात्रपाळीतील कामगार वाहनाची वाट पाहात उभे होते. मात्र, वाहनचालकाने गाडीची वाट पाहात असलेल्या कामगारांवरच गाडी चढविली. यात राजू महातो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ वेकालि माजरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असल्यामुळे प्राथमिक उपचार करुन त्याला नागपूर येथील आॅरेंज सिटी हॉस्पिटलला पाठविण्यात आले. तर दुसरा किरकोळ जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करुन सुटी देण्यात आली.
वेकोलि माजरी क्षेत्रात कोळसा काढणे व माती काढण्याची निविदा धनसार इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (डेको कंपनी) ला देण्यात आले. ही कंपनी मागील एक वर्षापासून माजरीच्या कुनाडा कोळसा खाणीत काम करीत आहे. ही कंपनी झारखंड येथील असून या कंपनीतील व्हाल्वो ट्रक, जेसीबी मशिन, पीसी मशिन, शावेल मशिन व इतर सर्व वाहने झारखंड राज्याचे पासिंग आहे. या कामगारांकडून आठ तास कामाऐवजी अधिक वेळ काम करवून घेतले जाते. कामगारांना कोळसा खदानीत काम करण्याचे प्रशिक्षणही दिले नाही. येथील जवळपास सर्वच कामगार झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातील आहे. कंपनीचे सर्व वाहन झारखंड पासिंग असल्यामुळे त्यांनी चंद्रपूरच्या आरटीओ कार्यालयाकडून वाहनांची तपासणी व परवानगी सुद्धा घेतलेली नाही. या डेको कंपनीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलेही शिबिर व माहिती फलक लागलेले नाही.
वेकोलि माजरीचे महाप्रबंधक सत्येंद्र पांडे यांना घटनेची माहिती होताच त्यांनी घटनास्थळावर जावून पाहणी केली व दवाखान्यात जावून जखमी कामगारांशी संवाद साधला. यावेळी माजरीचे खाण सुरक्षा अधिकारी, खाण नियोजन अधिकारी व कामगार संघटनेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)