विद्यार्थ्यांसाठी अपघात योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 05:00 AM2020-10-13T05:00:00+5:302020-10-13T05:00:25+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा दुदैवाने एखाद्यावेळी अपघात झाल्यास त्याच्या उपचारासाठी खर्च येतो. हा खर्च भागविताना पालकांना अनेकवेळा अडचणीचा सामना करावा लागतो. कधी कधी उपचाराचा आर्थिक भार संबंधित शाळेतील शिक्षकांनाही उचलावा लागतो.
साईनाथ कुचनकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये आता जिल्हा परिषद शाळांनीही तयारी सुरू केली आहे. यासाठी विविध प्रयोगांचा अवलंब केला जात आहे. जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी कुठेही मागे पडू नये यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांच्यासह शिक्षण विभाग परिश्रम घेत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास उपचाराचा खर्च करताना पालकांना आर्थिक ताण पडू नये, यासाठी शिक्षण समितीने विद्यार्थ्यांसाठी अपघात सामुग्रह योजना सुरू केली आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील ९८ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा दुदैवाने एखाद्यावेळी अपघात झाल्यास त्याच्या उपचारासाठी खर्च येतो. हा खर्च भागविताना पालकांना अनेकवेळा अडचणीचा सामना करावा लागतो. कधी कधी उपचाराचा आर्थिक भार संबंधित शाळेतील शिक्षकांनाही उचलावा लागतो. पालक तसेच शिक्षकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी अपघात सामुग्रह योजना सुरु केली आहे. यावर्षी पहिले वर्ष असल्याने जिल्हा परिषदेने २ लाख रुपयांची तरतुद केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना २० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येणार आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच चंद्रपूर जिल्हा परिषद राबविल्याचे बोलल्या जात आहे. या योजनेमुळे शिक्षकांसह शिक्षक संघटनांनीही समाधान व्यक्त केले आहे.
२ लाखांची तरतूद
अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शिक्षण समितीने प्रस्ताव मंजुर केला आहे. या योजनेचे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे पहिलेच वर्ष असल्याने जिल्हा परिषदेतील निधीमधून २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पैशातून विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांना मिळणार मदत
जिल्हा परिषदेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थी. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
असा करावा लागणार अर्ज
एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याच्या पालकांना प्रथम मुख्याध्यापकांना कळवावे लागणार आहे. मुख्याध्यापकांकडून चौकशी झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागामध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विचार करण्यात येणार आहे. अपघाताचे स्वरुप बघून विद्यार्थ्यांनी किती मदत करायची यासंदर्भात शिक्षण समिती ठरविणार आहे.
विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याचा उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शिक्षण समितीने सुचविलेल्या विषयानुसार ही तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारची तरतूद जिल्ह्यात पहिल्यांदाज करण्यात आली आहे.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, चंद्रपूर
विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी जिल्हा परिषदेने मदत करण्याची अनेक संघटना तसेच शिक्षकांची मागणी होती. या मागणीनुसार शिक्षण समितीमध्ये हा विषय ठेवण्यात आला आणि त्याला मंजुरी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी मदत मिळणार आहे.
- रेखा कारेकर,
शिक्षण सभापती, जि. प. चंद्रपूर