‘त्या’ अपघातातून उघड झाली कोळसा चोरीची नवी शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:28+5:302021-06-05T04:21:28+5:30
ट्रकच्या कॅबिनमध्ये ठेवले जातात मोठमोठे दगड नितीन मुसळे सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या कोळसा खाण परिसरातून जाणाऱ्या राजुरा-गोवरी मार्गावरील ...
ट्रकच्या कॅबिनमध्ये ठेवले जातात मोठमोठे दगड
नितीन मुसळे
सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या कोळसा खाण परिसरातून जाणाऱ्या राजुरा-गोवरी मार्गावरील माथरा गावानजीक रेल्वे क्रॉसिंगजवळ गुरुवारी ट्रकने दुचाकीला धडक देत एका वृद्ध इसमास गंभीर जखमी केले. चौकशीदरम्यान या अपघातातील ट्रकच्या कॅबिनमध्ये मोठमोठे दगड ठेवले असल्याचे दिसून आल्याने कोळसा चोरीची नवीच शक्कल उघड झाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून कोळसा खाणीतून अशाप्रकारे कोळसा चोरी होत असून, प्रशासनाचे मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यात वेकोलीच्या विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीतून मोठ्या प्रमाणात मागील अनेक वर्षांपासून कोळसा चोरी होत असल्याच्या घटना उघडकीस येतात. त्यासाठी विविध शक्कल लढविल्या जातात. यात मोठमोठ्या व्यापाऱ्यांपासून ते ट्रकचालकापर्यंतचे अनेक लोक कोळसा चोरीच्या व्यवहारात अडकलेले आहेत.
कोळसा खाणीतून निघणारा कोळसा डम्प यार्डपर्यंत पोहोचण्यापूर्वी किंवा मोठमोठ्या कंपन्यांकडे कोळसा पोहोचविण्यापूर्वीच त्याची चोरी केली जाते. ट्रक असो किंवा रेल्वे या दोन्ही ठिकाणाहून, याशिवाय चक्क वेकोलीच्या कोळसा खाण परिसरातील डम्प यार्डमधूनसुद्धा कोळशाची चोरी होते. कोळसा चोरीच्या अनेक घटना उघडकीस येऊनही प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. यात कोळसा चोरांचे चांगलेच फावत आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बबन ऊरकुडे यांनी केली आहे.
बॉक्स
असा चोरला जातो कोळसा
कोळसा खाणीतून निघालेला कोळसा डम्प यार्ड, रेल्वे यार्डकडे किंवा कोळसा खरेदीदाराकडे नेण्यापूर्वी त्याचे वजन केले जाते. तेवढ्याच वजनाचा कोळसा आवश्यक त्या ठिकाणी पोहोचणे आवश्यक असते; परंतु तो पोहोचण्यापूर्वीच ट्रकमधील कोळसा उतरवून तो परस्पर विकला जातो. परंतु ट्रकचे वजन मेंटेन करण्याकरिता मात्र या ट्रकच्या कॅबिनमध्ये तेवढ्याच वजनाचे मोठ-मोठे दगड ठेवले जातात आणि वजन अगदी बरोबर ठेवून मोठ्या शिताफितीने कोळशाची चोरी केली जाते. यात वेकोलीसोबतच कोळसा खरेदी करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
बॉक्स
अनेक वर्षांपासून प्रकार सुरू
अनेक वर्षांपासून असा प्रकार सुरू असून, याकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे.
गुरुवारी झालेल्या अपघातानंतर ट्रकच्या कॅबिनमध्ये मोठमोठे दगड दिसून आले. हे दगड वजनकाट्यावर खाली ट्रकचे वजन वाढविण्यासाठी ठेवल्या जाते. कोळसा भरताना हे दगड बाहेर टाकून अवैधरीत्या कोळसा विकला जात असून, मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी होत आहे.