अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:11+5:302021-07-02T04:20:11+5:30
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये झालेला अपघात हा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाला असून, कामगारांना सेफटी ...
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये झालेला अपघात हा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे झाला असून, कामगारांना सेफटी बेल्ट नसल्यानेच अपघात झाल्याचा आरोप सिमेंट कामगार संघटनेचे महामंत्री साईनाथ बुच्चे यांनी केला आहे. दरम्यान, मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले आहे.
नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये संतोष चव्हाण या कामगाराचा ६० मीटर उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला. यानंतर कामगार संघटनेच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन करून कारखान्याच्या अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आला. यात कामगार नेते नरेशबाबू पुगलियांच्या नेतृत्वात कामगार संघटनेचे महासिचव श्रीनिवास गाडगे, कार्याध्यक्ष उत्तम उपरे, सागर बल्टी यांनी कामगारांच्या सहकार्याने कंपनीतील अधिकाऱ्यांना बाहेर पडू दिले नाही. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच नोकरीची मागणी रेटून धरली. कामगार नेते साईनाथ बुचे, अजय मानवटकर तसेच इतर राजकीय पक्षाचे पुढारी काही कामगार संघटनांचे नेते दवाखान्यात दाखल झाले. व्यवस्थापनाने साईनाथ बुचे यांच्यासोबत चर्चा करून १६ लाख रुपये आर्थिक मदत तसेच दोन नोकरी हा समझोता घडवून आणला. त्यानंतर उपस्थित कामगार संघटनांनी सहमती दर्शविली. यावेळी गडचांदूर पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिलकुमार नायक यांनी कंपनी व्यवस्थापन तसेच कामगार संघटना यांच्यात समन्वय घडवून आणला.