वडिलांच्या डोळ्यादेखत सहाय्यक अन्न पुरवठा निरीक्षक मुलाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 02:18 PM2022-03-22T14:18:40+5:302022-03-22T14:38:03+5:30
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील कुणाल हा वर्धा येथे सहायक अन्नपुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत होता. होळीनिमित्त तो विसापूरला सुट्टीवर आला होता.
बल्लारपूर (चंद्रपूर) : मुलाला बल्लारपूर रेल्वे स्थानकावर दुचाकीने साेडून देताना ट्रकची धडक बसली. वडील रस्त्याच्या कडेला पडले तर मुलगा ट्रकखाली आला. त्यात घटनास्थळीच मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात बल्लारपूर येथील काटा गेटसमाेर सोमवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास झाला.
कुणाल गजानन डबरे (३४) असे मृताचे नाव आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील कुणाल हा वर्धा येथे सहायक अन्नपुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत होता. होळीनिमित्त तो विसापूरला सुट्टीवर आला होता. कुटुंबीयांसोबत होळी साजरी केल्यानंतर सोमवारी सकाळी तो वर्धा येथे परत जाणार असल्याने वडील गजानन डबरे व कुणाल हे बापलेक स्कुटीने (एमएच-३४/टी-१४२० ) बल्लारपूर रेल्वे स्टेशनकडे जात होते. दरम्यान, बल्लारपूर येथे मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच-३४/व्ही-०९९४) स्कुटीला जबर धडक दिली. यात कुणालचे वडील हे रस्त्याच्या बाजूला पडले, तर कुणाल ट्रकच्या चाकाखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, चालक ट्रक जागीच सोडून पसार झाला. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
कुणालला चिमुकल्या जुळ्या मुली
कुणालचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला एक वर्ष वयाच्या जुळ्या मुली आहेत. कुणालची पत्नी सातारा जिल्ह्यात सहायक अन्नपुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत आहे. दोघांची दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत नोकरी असल्याने ते फोनवरच बोलत होते. दोन महिन्यांपूर्वी कुणाल पत्नी व मुलींना भेटण्यासाठी साताऱ्याला होता. आता ही भेट कधीही शक्य नाही. या घटनेने विसापुरात शोककळा पसरली आहे.