लहान मुलाचा विवाह लावून परत येताना आईचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 15:26 IST2024-05-04T15:25:45+5:302024-05-04T15:26:33+5:30
Chandrapur : आदल्या दिवशी झाला होता मोठ्या मुलाचा विवाह

Accidental death of mother while returning from son's marriage
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली: गडचिरोली जिल्ह्यातील रांगीनजीक निमगाव येथे लहान मुलाचा विवाह लावून दुचाकीने सावलीकडे येताना पिकअप वाहनाने धडक दिल्याने नवरदेवाच्या आईचा मृत्यू, तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना २ एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळी ७:४५ वाजता गडचिरोलीतील कारगिल चौकात घडली. रेखा नामदेव राऊत (४४), असे मृतक महिलेचे नाव आहे, तर दुचाकीस्वार बंडू भलवे (२७, रा. सावली) हा गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे आदल्या दिवशी मोठ्या मुलाचा विवाह झाला होता.
सावली येथील नामदेव राऊत यांच्या दोन मुलांचे लग्न होते. अमित राऊत नामक मोठ्या मुलाचे लग्न १ मे बुधवारी सावली येथे पार पडले, तर २ मे रोजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीनजीकच्या निमगाव येथे होते. हे लग्नकार्य आटोपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकीचालक बंडू भलवे यांच्यासोबत गडचिरोलीमार्गे सावलीकडे येत होती. दरम्यान, कारगिल चौकात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत रेखा राऊत यांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार बंडू भलवे यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्वागत सभारंभाच्या दिवशीच आईवर अंत्यसंस्कार
अमित आणि अविनाश या दोन भावंडांच्या विवाहानंतर शुक्रवारी स्वागत सभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आई रेखा राऊत यांच्यासोबत कुटुंबातील सर्वच मंडळी आनंदात होती. मात्र, अपघाताने आईला हिरावून घेतले. आजचा स्वागतसभारंभ रद्द करून भावंडांनी शोकाकुल वातावरणात चारगाव नदी घाटावर आईला अखेरचा निरोप दिला. यावेळी नातेवाइकांसह शहरातील नागरिकांनाही अश्रू आवरता आले नाहीत.