मूल-चंद्रपूर मार्गावर अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:33 PM2018-07-16T23:33:40+5:302018-07-16T23:33:55+5:30
चंद्रपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राट जिल्ह्याबाहेरील कंपनीला दिले असून मूल ते जानाळा पर्यंत डांबरीकरण असलेल्या रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चंद्रपूर ते गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामाचे कंत्राट जिल्ह्याबाहेरील कंपनीला दिले असून मूल ते जानाळा पर्यंत डांबरीकरण असलेल्या रस्त्याचे खोदकाम करून त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली आहे. परंतु, सहा महिने लोटूनही रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या अर्धवट कामामुळे या मार्गावर अनेक अपघात घडत आहेत.
चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील ६ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. मूलपासून तर जानाळापर्यंत चांगल्या स्थितीत असलेला डांबरी रस्ता खोदून टाकण्यात आला. त्या ठिकाणी भिसी माती भरण्यात आली असून यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत.
पावसामुळे तर या मुख्य मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहन चालविणे घातक ठरत आहे. या रस्त्यावर रोज किरकोळ अपघात घडत असून कधी कोणाचा नाहक बळी जाईल, हे सांगता येत नाही.
बुध्द टेकडी ते आगडीपर्यंत सदर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून १४ मिटरचा हा मुख्य रस्ता तयार करण्यात येणार आहे. वनविभागाचे वृक्ष रस्त्याच्या मधे येत असल्यामुळे या रस्त्याचे काम थांबविण्यात आल्याचे एका राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तुर्तास या रस्त्याचे काम रखडले असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.