भाविकांसाठी निवास, पाण्याची व्यवस्था
By admin | Published: April 8, 2017 12:46 AM2017-04-08T00:46:57+5:302017-04-08T00:46:57+5:30
चंद्रपूरचे आराध्य दैवत प्रसिद्ध महाकाली मातेच्या यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांची काळजी घेण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका सज्ज झाली आहे.
महाकाली यात्रा : फिरते शौचालय, आरोग्य सुविधा, हायमास्ट दिवे
चंद्र्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत प्रसिद्ध महाकाली मातेच्या यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांची काळजी घेण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शौचालये, तात्पुरती फिरती शौचालये, आरोग्य सुविधा, निवासाची व्यवस्था आदी उपलब्ध करण्यात आली आहे. महाकाली मंदिराजवळच्या मनपा प्राथमिक शाळेमध्ये अस्थायी स्वरूपाचे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले.
महानगर पालिकेने यात्रेतील व्यवस्थेसाठी निधीची तरतूद केली आहे. महाकाली मंदिराच्या समोरील रस्त्या ओलांडल्यावर बैलबाजार आहे. या बाजाराच्या विस्तीर्ण मैदानाच्या परिसरात, अंचलेश्वर गेट येथे शौचालय उभारण्यात आले आहे. याशिवाय फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आल्याचे स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनूरवार यांनी सांगितले. २० सीटचे अतिरिक्त तात्पुरते शौचालयही आहे. त्यामुळे यात्रा परिसरात अस्वच्छता राहू नये, याची काळजी मनपाने घेतली आहे. या परिसरात असलेले तीन स्थायी शौचायलेही सुरू करण्यात आली आहेत. २५० सफाई कामगार कार्यरत असून ब्लिचिंग पावडर, फॉगिंग फवारणी, सफाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनपा व वेकोलि यांच्या संयुक्त प्रयत्नाने आरोग्य व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या कार्यालयालगत आरोग्य सुविधा केंद्र उभारण्यात आहे. या ठिकाणी महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी यात्रेकरूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करीत आहेत. उन्हाळ्याचे दिवस आणि अशुद्ध पाणी ही यात्रेकरूंच्या अनारोग्याची मुख्य कारणे आहेत. त्यामुळे रुग्णांची दिवसभर रूग्णांची गर्दी असते. रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार केला जातो. आवश्यकता असल्यास रूग्णाला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्याकरिता दोन अम्बुलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापतरी अशा स्वरूपाचे रूग्ण आले नसल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
आंघोळीसाठी १० शॉवर्स
झरपट नदीच्या बंधाऱ्याजवळ काठावर १० शॉवर्स लावून स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी पुलाखाली स्रानाची व्यवस्था करण्यात आली असून महिलांना वस्त्र बदलण्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. नदीपात्रात कुणी बूडू नये, यासाठी जवानही तैनात आहेत. झरपट नदी पात्रात कोणीही गडबड करू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे पाच कर्मचारी गस्त घालत आहेत. त्यामुळे नदीपात्रात कोणताही गोंधळ उडालेला नाही. नदीपात्रात पाणी अडवून आंघोळीसाठी पाणीसाठा तयार करण्यात आला आहे. सायंकाळी ते पाणी सोडण्यात येऊन पुन्हा पाणी अडविण्यात येते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने भाविकांच्या बचावासाठी बोट तैनात ठेवली आहे.
बैलबाजारात १५ हजार चौरस
फुटांचा मंडप
बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांना राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन बैलबाजार साफ करून विस्तीर्ण मैदानावर १५ हजार चौरस फुटाचा मंडप टाकण्यात आला आहे. तेथे भाविक स्वयंपाक करून रात्री झोपदेखील काढत असतात. भाविकांच्या राहण्यासाठी महाकाली मंदिराच्या मागे शाळा उघडण्यात आली आहे. चहारे वाडी, तुळजाभवानी मंदिर, गावंडेवाडी, महाकाली मंदिराचे सभागृह आदी ठिकाणीदेखील भाविकांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे.
झरपट नदी पात्रात हायमास्ट
यात्रा सुरू होण्यापूर्वीच झरपट नदीच्या पात्रात हायमास्ट विद्युत दिवे लावण्यात आल्याची माहिती मनपाचे शहर अभियंता महेश बारई यांनी सांगितले. यात्रा परिसरात यात्रेकरूंवर अंधाराचा सामना करण्याची वेळ येऊ नये, याचीही काळजी मनपा प्रशासनाने घेतली आहे. अंचलेश्वर गेट, बैल बाजार, महाकाली मंदिरालगत आदी भागात अतिरिक्त फोकस लावण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुकानांचे नियोजन करून नागरिकांना त्रास होऊ नये, याचीही काळजी घेण्यात आली आहे.
२४ तास पिण्याचे
पाणी उपलब्ध
महाकालीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी २४ तास पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. बैलबाजारात आठ टॅप्स लावून महाकाली मंदिराच्या जलकुंभावरून थेट जोडणी देण्यात आली आहे. महाकाली मंदिराच्या मागे सहा टॅप्स लावण्यात आले आहेत. त्यावरूनही २४ तास सेवा देण्यात येत आहे. झरपट नदी काठावरील मंदिराजवळ पाण्याच्या टाकीला नळ लावण्यात आले आहेत.