आरोग्य सेविकेचे आरोप तथ्यहीन
By admin | Published: October 19, 2016 02:07 AM2016-10-19T02:07:31+5:302016-10-19T02:07:31+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सुप्रिया भगत हिने लावलेले सर्व आरोप खोटे असून
पत्रकार परिषद : आरोग्य सेविकेला निलंबित करण्याची मागणी
गांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सुप्रिया भगत हिने लावलेले सर्व आरोप खोटे असून आरोप सिद्ध न झाल्यास तिला नोकरीतून निलंबित करावे अशी मागणी आवळगाव येथील सरपंच ज्योती जनबंधू तसेच गावातील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
आवळगाव येथील आरोग्यसेविका सुप्रिया भगत हिने आपल्यावर हल्ला तसेच विनयभंग करणे व जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आवळगावच्या सरपंच ज्योती जनबंधू, त्याचे पती अश्वजित जनबंधू, नितीन कुळमेथे, बाळू नरूले, काशिनाथ वारजूरकर, रामदास उरकुडे, तसेच अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात सरपंच व संबंधित नागरिकांनी तसेच गावकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन लावण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले.
ज्योती जनबंधू म्हणाल्या की, मी स्थानिक जि.प. सदस्या यांच्याकडे जावून संबंधित आरोग्य सेविकेच्या बदलीचा अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नावाने लिहिला. यावेळी मी एकटीच गेली होती. माझे पती अश्वजित जनबंधू तसेच इतर कोणीही माझ्यासोबत नव्हते. याबाबत ८ आॅक्टोबरला तालुका आरोग्य अधिकारी व मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रसूतीच्या चौकशीसाठी आले असता संबंधित आरोग्य सेविकेने विनयभंगासारखा प्रकार आपल्या वरिष्ठांना का कळविला नाही? ११ आॅक्टोबरला विनयभंग, जिवे मारण्याची धमकी अशी तक्रार दाखल केली. ती वैमनस्यातून असून तक्रारीत दाखल व्यक्तींचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यांनी आरोग्यसेविकेच्या बदली संदर्भातील अर्जावर सही केल्यामुळे त्यांना गोवण्यात आलेले आहे. व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व आरोग्य सिद्ध न झाल्यास संबंधीत आरोग्य सेविकेला निलंबित करण्यात यावी अशी मागणी सरपंच ज्योती जनबंधू, अश्वजीत जनबंधू, रामदास भोयर, रामदास उरकुडे, सरिता भोयर, मंजुषा डवरे, उपसरपंच आशा भोयर, नीतेश कुळमेथे, काशीनाथ वारजूकर, विनोद मेश्राम, विनोद ठाकरे, विलास शेंडे, नंदू कुळमेथे यांनी केली आहे. (वार्ताहर)
रस्त्यात महिलेची प्रसूती
आपण ३ आॅक्टोबरला विद्या विनोद मेश्राम ही महिला प्रसूतीकरिता दुपारी १ ते १.३० च्या सुमारास आवळगाव येथे गेली असता कर्तव्यावर असलेल्या सुप्रिया भगत यांनी जवळपास अर्धा तास स्वास्थ उपकेंद्राचे दार उघडले नाही. त्यामुळे आशा वर्कर मंजुषा डवरे यांनी मुडझा येथे अॅम्बुलन्स करिता फोन लावला असता वाहन चालकाने गाडी नादुरुस्त असल्याचे उत्तर दिले. विद्या मेश्राम यांना खासगी वाहनाने आरमोरीला नेत असताना चिचगावजवळ प्रसूती झाली. त्यानंतर पुन्हा विद्याला गावाकडे परत आणण्यात आले. त्यानंतर बाळाची नाळ कापण्यासाठी आरोग्य उपकेंद्रात नेले असता आरोग्यसेविकेने कसलाही प्रतिसाद दिला नाही. या प्रकारामुळे चिडलेल्या नागरिकांनी सुप्रिया भगत यांच्या बदलीची तक्रार माझ्याकडे आणून दिली. मी सरपंच आणि ग्रामआरोग्य समितीची अध्यक्ष म्हणून संबंधीत आरोग्य सेविकेला विचारणा केली असता मी झोपेच्या गोळ्या खावून झोपली होती, असे आश्चर्यकारक उत्तर दिले.