रोजगार सेवकाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप
By Admin | Published: May 28, 2015 12:01 AM2015-05-28T00:01:33+5:302015-05-28T00:01:33+5:30
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची गावकऱ्यांची ...
चौकशी कासवगतीने : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी
नवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची गावकऱ्यांची ओरड असताना चौकशी मात्र कासवगतीने होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नवरगाव येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत २०१३ ते २०१५ या कालावधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना केली होती. रोजगार हमीच्या कामामध्ये एकाच जॉबकार्डवर त्या कुटुंबातील व्यक्तीव्यतिरिक्त इतर नागरिकांचे नाव टाकून हजेरी लावून बिल उचलले तर एकाच व्यक्तीचे कामाचे पैसे अलग अलग बँक अकाऊंटमधून परस्पर उचलले, एक व्यक्ती २०१३ मध्ये ६९ दिवस, २०१४ मध्ये २२५ दिवस, तर २०१५ मध्ये २० दिवस कामावर दाखविण्यात आली. परंतु प्रत्येक मजुराला १०० दिवस काम असताना २०१४ मध्ये एकाच व्यक्तीला २२५ दिवस कामावर लावल्याची चर्चा आहे. एकाच मजुराची एकाच दिवशी दोन ठिकाणच्या कामावर नोंद घेतल्या गेली तर काही व्यक्तीला दोन बायका- मुलं दाखवून त्यांच्याही नावे मजुरी उचलली असल्याचा आरोप आहे. एक ग्रामपंचायत सदस्य कामावर गेला नाही. मात्र त्याच्याही नावाने पैसे उचलले आहेत. काही मजूर अस्तित्वातच नाही. अशाही व्यक्तीची हजेरी लावून पैशाची उचल केली. माळी मोहल्ला ते बांध तलाव पांदण रस्त्यावर बोल्डर न टाकताच पैशाची उचल केली. प्रकाश खोब्रागडे ते वामन बोडणे पांदण रस्त्यावर मुरुम न टाकताच पैशाची उचल केली, असे विविध आरोप तक्रारकर्त्यांनी रोजगार सेवकावर लावलेले आहेत.
तसेच नवरगाव येथे १३० शोषखड्डे खोदण्याचे दाखवून एका शोषखड्ड्याच्या मागे १८०० रुपयेप्रमाणे पैशाची उचल केली असून प्रत्यक्षात मात्र ३० ते ३५ शोषखड्डेही आता उपलब्ध नाहीत. काही बुजलेले तर काही खड्डेच खोदले नसल्याचा आरोपही तक्रारकर्त्यांनी केला आहे.
मात्र या संपूर्ण प्रकरणात केवळ रोजगार सेवकावरच भ्रष्टाचाराच्या आरोपाचा ठपका तक्रारीत असून इतर अधिकाऱ्यांवर आरोप नाही. २२ मे रोजी चौकशी करण्यासाठी तालुकास्तरावरुन समिती आली. काही नागरिकांचे बयाण घेतले व तक्रारकर्त्यांचे बयाण घेतले. तेव्हापासून या प्रकरणाची चौकशी ठप्प आहे. यापूर्वीही २० फेब्रुवारी २०१४ ला येथील ग्रा.पं. सदस्य आनंदराव टिपले यांनी नर्सरीमधील रोपाची परस्पर विल्हेवाट लावण्याचा आरोप करुन वरिष्ठ स्तरावर तक्रार केली होती. ग्रा.पं. नवरगाव येथील मग्रारोह १०० कोटी वृक्ष लागवडी योजनेंतर्गत २१ हजार १०० रोपांची नर्सरी तयार करण्यात आली. त्यापैकी १ हजार ३२० रोपांची लागवड केली. विविध संस्थांना ३ हजार ८५० रोपे वाटप केली तर शेतकऱ्यांना १३ हजार ९३० रोपे वाटप केली. म्हणजेच १९ हजार १०० लागवड वाटप केली व शिल्लक रोपे २ हजार दाखविण्यासाठी जाळल्याचा आरोप तक्रारीत केला होता. या प्रकरणाची चौकशी झाली.
रोजगार सेवकाने १० ते १२ हजार रोपे जाळल्याचा आरोप ठेवून कार्यवाहीस पात्र असल्याचा ठपका ठेवला तर ग्रामविकास अधिकारी बी.सी. शंभरकर यांनीसुद्धा नर्सरीमधील रोपांची नोंद साठा रजिस्टरवर घेतली नसल्याने कर्तव्यात कसूर केली. तेसुद्धा जि.प. सेवा शिस्त १९६४ चे नियम ४ नुसार कारवाईस पात्र असल्याचा ठपका ठेवण्यात आला. आता पुन्हा भ्रष्टाचाराच्या तक्रारी झाल्या आहेत. (वार्ताहर)