आईशी संगनमत करून आरोपींनी केला गर्भवतीचा खून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:36+5:302021-08-15T04:29:36+5:30
ब्रम्हपुरी : आरोपींचे मृत मुलीशी विवाह होण्याआधीपासून संबंध होते. याआधी गर्भधारणा झाली, तेव्हा ते गर्भ पाडण्यात यशस्वी झाले. मात्र, ...
ब्रम्हपुरी : आरोपींचे मृत मुलीशी विवाह होण्याआधीपासून संबंध होते. याआधी गर्भधारणा झाली, तेव्हा ते गर्भ पाडण्यात यशस्वी झाले. मात्र, यावेळी गर्भ पाडू शकले नाहीत. त्यामुळे मृत मुलीच्या आईशी संगनमत करून तिचा शारीरिक छळ करून तिला संपविण्याच्या हेतूने विहिरीत फेकून खून केल्याचा आरोप खंडाळा ग्रामपंचायतीने केला आहे. ग्रामपंचायतीच्या लेटर पॅडवर लेखी स्वरूपात ११ ऑगस्टला पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खंडाळा येथील रहिवासी सुचिता मनोहर राखडे (वय २८) हिच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे लग्नाआधीपासून ती आईसह आरोपी रत्नाकर पुंडलिक शेंडे व त्याचा भाऊजी पुंडलिक सतीबावने यांच्या शेतावर व घरकाम करत होती. तेव्हापासून दोघांचेही सुचितासोबत अनैतिक संबंध होते. दोघेही आरोपी व्यभिचारी असून, आपल्या पैशाच्या व ताकदीच्या जोरावर गावात अरेरावीने वागत होते. गावातील अनेक महिलांवर त्यांची वाकडी नजर होती. आरोपींच्या वागणुकीमुळे गावात दहशत निर्माण झाली आहे. मृत सुचिता हिला पतीपासून फारकत घेण्यात दोन्ही आरोपींचा हात होता.
आरोपींचे मूळ गाव (साखरा, जि. भंडारा) असून, तेथेही त्यांची वागणूक तशीच होती. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना गावातून हाकलून दिले, असे ग्रामपंचायतीने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. दोन्ही आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांना गावातून तसेच जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करून भयभीत वातावरण नष्ट करावे. तसेच गावातील आया-बहिणींची अब्रू वाचवावी, अशी मागणी दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.
कोट
या खून प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करण्यात यावी, कडक कारवाई व्हावी व आरोपींना तडीपार करण्यात यावे.
- अर्चना राजेश डेंगे,
सरपंच, खंडाळा.
कोट
या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या तक्रारीनुसार तपासात जर आणखी आरोपी आढळले, तर कायदेशीर कारवाई करू. त्यांच्या याआधीच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता किंवा गंभीर गुन्हे असतील, तर तशी तडीपार करण्याची कारवाई करता येईल.
- रोशन यादव, पोलीस निरीक्षक, ब्रह्मपुरी.
140821\img-20210814-wa0098.jpg
खंडाळा ग्रामपंचायतीची इमारत