अटकेतील आरोपी माजी नगरसेवकाचा मुलगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:38 PM2018-04-04T23:38:08+5:302018-04-04T23:38:08+5:30
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनोना परिसरात दीपक लक्ष्मण टवलारकर यांना मारहाण करून त्याची चोरून नेलेली कार आरोपी उत्कर्ष नागोसे व त्याच्या मित्राने तोडफोड करून पेटवून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनोना परिसरात दीपक लक्ष्मण टवलारकर यांना मारहाण करून त्याची चोरून नेलेली कार आरोपी उत्कर्ष नागोसे व त्याच्या मित्राने तोडफोड करून पेटवून दिली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. दुसरा आरोपी अद्यापही फरारच असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. सदर प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी नागोसे हा माजी नगरसेवकाचा मुलगा असल्यामुळे सुरुवातीपासूनच पोलिसांवर राजकीय दबाब असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. यामुळे दुसरा आरोपी अटक होण्याची शक्यताही धूसर असल्याचेही बोलले जात आहे.
पेटविल्यानंतर कोळसा झालेली कार अद्यापही घटनास्थळीच उभी आहे. उलट तपास अधिकारी कार पोलीस ठाण्यात आणण्यासाठी दोन स्टेपन्या घेऊन येण्याची सूचना करीत असल्याचा आरोप फिर्यादी दीपक लक्ष्मण टवलारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
दीपक टवलारकर यांची मारुती ८०० कार घरासमोरून बेपत्ता झाल्याची बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यानंतर घटनेची तक्रार करण्यासाठी पोलिसात धाव घेतली मात्र तक्रार नोंदवून घेण्याऐवजी कार शोधण्याचा सल्ला दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
यानंतर दीपक टवलारकर यांनीच कारचा शोध घेतला असता कारमध्ये उत्कर्ष नागोसे व त्याचा मित्र कारमध्ये बसून होता. त्यांना टोकले असता त्यांनी हुज्जत घालून लाकडाच्या बल्लीने प्राणघातक हल्ला चढविला. मारून टोकतील या भीतीने दीपक यांनी तेथून पळ काढताच त्या दोघांनी कारची तोडफोड करून पेटवून दिली. पोलिसांनी आधीच तक्रार नोंदवून तपास केला असता तर ही घटना टळली असती, असा आरोपही फिर्यादीने केला आहे. मात्र राजकीय हालचालीनंतर या प्रकरणात समझोता घडवून आणण्यासाठी दबाब वाढत असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. या घटनेचा तपास शहर पोलीस करीत आहेत.
दोघांनी टवलारकर यांची कार चोरून नेली. कारमालकाला गंभीर मारहाण करून कार पेटवून दिली. या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसरा आरोपी फरार आहे. कार जळून राख झाल्यामुळे कागदोपत्री जप्त केल्याचे दाखविले आहे. याप्रकरणात पोलीस निष्पक्षपणे चौकशी करीत आहे. कुठलाही राजकीय दबाब नाही. त्यांना न्याय दिला जाईल.
- एस. एस. भगत, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन, चंद्रपूर.