अद्याप आरोपी फरारच
By admin | Published: November 16, 2016 01:43 AM2016-11-16T01:43:05+5:302016-11-16T01:43:05+5:30
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील दुचाकी वाहनाने जाणाऱ्या दाम्पत्यास भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न झाला.
गुन्हा दाखल : दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न
वरोरा : नागपूर-चंद्रपूर मार्गावरील दुचाकी वाहनाने जाणाऱ्या दाम्पत्यास भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न झाला. यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी वरोरा पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २४ तासांचा कालावधी लोटूनही आरोपी गवसले नाही.
सोमवार १४ नोव्हेंबर रोजी एमएचटी १०६९ या दुचाकी क्रमांकाने डॉ. चेतन बोबडे पत्नीसह नागपूर येथून भद्रावतीकडे जात होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगली गावाच्या शेतशिवारात मागवून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी या दाम्पत्यास लुटण्याचा जोरदार प्रयत्न केला. दाम्पत्यांनी आरडओरडा करताच लुटणारे दुचाकीस्वार नागरिक येत असल्याची चाहूल लागताच पळून गेले. दुचाकी वाहनधारकांनी हेलमेट घातले होते. त्यामुळे त्यांना ओळखता आले नाही. याबाबत वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३९३ भादवि गुन्हा नोंदविला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट देवून तपासणी दिशा तपास अधिकाऱ्यांना दिली. वरोरा पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून दुचाकीधारकांचा शोध घेण्याचा प्रयत्न १४ नोव्हेंबर रोजी केला. परंतु अज्ञात आरोपीची व त्यांच्या दुचाकी वाहनाचा थांगपत्ता पत्ता लागला नाही. वरोरा पोलिसांचे पथक मागील २४ तासांपासून या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे परंतु अद्यापही सुगावा लागलेला नाही. नागपूर चंद्रपूर मार्ग वर्दळीचा असून या मार्गावर भर दिवसा दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न झाल्याने दुचाकी धारकामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात चोरट्यांनी देशी कट्टा दाखविल्याची चर्चा केली जात आहे. काही वर्षापूर्वी देशी कट्ट्याचा धाक दाखवून मांगली गावाच्या शिवारात तेल व्यापाऱ्याला लुटले होते. त्यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. (तालुका प्रतिनिधी)