‘त्या’ आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी
By Admin | Published: June 13, 2016 02:29 AM2016-06-13T02:29:03+5:302016-06-13T02:29:03+5:30
पैशाच्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
ब्रह्मपुरी : पैशाच्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
ब्रह्मपुरी येथील वनविभागाच्या पटांगणावर शुक्रवारच्या रात्री अजय श्यामराव रामटेके (२३) रा.ब्रह्मपुरी याची त्याच्याच एका अल्पवयीन मित्राने पैशाच्या वादातून हत्या केली होती. शनिवारी सकाळी या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच, शहरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृताची ओळख पटल्यानंतर अजय रामटेके याच्या मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला. ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाला वेग देऊन मृत अजयच्या ३ ते ४ मित्रांना अवघ्या तीन तासात ताब्यात घेतले. त्यांची कसून विचारपूस केल्यानंतर या चौघांपैकी अल्पवयीन असलेल्या अजयच्या मित्राने आपण एकट्यानेच अजयची हत्या केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला रितसर अटक केली. मारेकरी १७ वर्षांचा असल्याने त्याला न्यायालयाच्या आदेशावरून चंद्रपूरच्या बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.
या हत्या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी असल्याची शंका पोलिसांना होती. पोलिसांनी त्या दिशेने तपासही केला. परंतु अखेरपर्यंत अल्पवयीन आरोपीने आपण स्वत:च अजयचा खून केल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात त्याला एकट्यालाच आरोपी करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)