नागभीड तालुक्यातील गावात राष्ट्रीय पेयजल योजनेस ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:58 PM2017-11-20T23:58:08+5:302017-11-20T23:58:58+5:30
गेल्या आठ-दहा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले तरी फार कमी योजना पूर्ण झाल्या.
घनश्याम नवघडे।
आॅनलाईन लोकमत
नागभीड : गेल्या आठ-दहा वर्षांपासून नागभीड तालुक्यात पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू असले तरी फार कमी योजना पूर्ण झाल्या. उर्वरीत योजना विविध कारणांमुळे अपूर्ण असून यात शासनाचा करोडो रूपयांचा निधी पाण्यात गेला आहे.
सर्वांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. यात जलस्वराज्य, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अशा विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी शासनाने प्रत्येक योजनेसाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. असे असले तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीमुळे आणि स्थानिक पाणी व्यवस्थापन समित्यांच्या अज्ञानामुळे व काही ठिकाणी भ्रष्ट प्रवृत्तीमुळे या योजनांचा बट्याबोळ झाला आहे.
सन २०१३-१४ यावर्षी मान्यता मिळालेल्या अनेक योजना आहेत. यात मोहाळी (मोकासा), ईरव्हा (टेकडी), चिंधीचक, खडकी (हुमा), मिंथूर, कोटगाव, पारडी (ठवरे), कोथुळणा या गावांचा समावेश आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत मिंडाळा, कोदेपार, उश्राळ मेंढा, सोनुली (बु.) या ठिकाणी नळ योजनांना मंजुरी देण्यात आली. पण या योजनासुद्धा अपूर्णच आहेत. सर्वच योजना विविध कारणांमुळे अपूर्ण असून या योजनांचे विहिर, उर्ध्वनलिका, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था अशी कामे रखडली आहेत. अनेक योजनांना आवश्यक निधीचा तिसरा हप्ता मिळालेला नाही.
प्रत्येक योजनेला लाखोंचा निधी
मोहाळी योजनेस ४९.३६ लाखांचा निधी मंजूर असून आतापर्यंत ३५.८० लाख रुपये खर्च झाले आहेत. ईरव्हा येथे १९.१० लाख रुपये मंजूर असून १०.४९ लाख खर्च, चिंधीचक येथे ४२.४२ लाख मंजूर तर २०.४३ लाख खर्च, खडकी येथे ३६.८० लाख मंजूर आणि १९.३३ लाखांचा खर्च, मिंथुर येथे ४८.४९ लाख मंजूर तर १९ लाखांचा खर्च, कोटगाव येथे ४५ लाख मंजूर तर २८.५३ लाख खर्च, पारडी (ठवरे) येथे ४८ लाख मंजूर तर ३०.०९ लाख खर्च, कोथुळणा येथे ३८.८८ लाख मंजूर तर खर्च २८.९६ लाख, मिंडाळा येथे ४९ लाख मंजूर असले तरी या योजनेवर किती खर्च करण्यात आला याचा तपशील मिळू शकला नाही. उश्राळा मेंढा येथे ४० लाख मंजूर तर २४ लाख खर्च, सोनूली(बु.) येथे ४०.३८ लाख मंजूर असून आतापर्यत २२.६५ लाख रुपये खर्च झाले आहे.