पाणी पुरवठा योजनेला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:25 PM2018-02-04T23:25:25+5:302018-02-04T23:26:34+5:30

खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण झाले.

Acquisition of water supply scheme | पाणी पुरवठा योजनेला ग्रहण

पाणी पुरवठा योजनेला ग्रहण

Next
ठळक मुद्देपाच लाखांचे देयक थकित : महावितरणचा वीज जोडणीला नकार

आॅनलाईन लोकमत
कोठारी : खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम पूर्ण झाले. पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी वीज जोडणीची प्रतीक्षा असून वीज वितरण कंपनी पाच लाखांचे थकित वीज देयक भरल्याशिवाय वीज जोडणीस नकार देत असल्याने थेंबभर पाणी मिळण्याअगोदरच पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे.
१९८४ ची पाणी पुरवठा योजना ग्रा.पं.च्या अकार्यक्षमतेने दहा वर्षापासून बंद आहे. कोठारीकरांना आठ हातपंपावर अवलंबून राहावे लागते आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याने शासनाने वर्धा नदीवर एक लाख ६० हजार लिटर क्षमतेची नवीन पाणीपुरवठा योजना खनिज विकास निधी अंतर्गत साडेतीन कोटी खर्चून पूर्ण केली. त्यात वर्धा नदीचे पाणी शुद्धीकरण करुन गावकऱ्यांना पुरविण्याची योजना आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा विभागाने योजना पूर्ण करुन आक्टोंबर २०१६ मध्ये त्याची तपासणी केली. ग्रा.पं.च्या निवडणुकीपूर्वी योजनेचे उद्घाटन केले. गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दहा वर्षांच्या संघर्षानंतर आता नळाद्वारे पाणी मिळेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र वीज वितरण कंपनीचे पाच लाख ८० हजार मागील अनेक वर्षापासून ग्रा.पं.कडे थकित आहे. वीज जोडणी केल्याशिवाय योजना सुरु होऊ शकत नाही. महावितरण थकित देयक भरल्याशिवाय वीज जोडणीला नकार देत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे.
सध्या उन्हाळा सुरु होण्याच्या तयारीत असून गावकरी पाण्यासाठी आक्रोश करीत आहेत. गावातील आठ हातपंपापैकी अनेक हातपंप नादुरुस्त आहेत. हातपंप दुरुस्ती करण्याची जबाबदारी पंचायत समितीची असून त्याकडे तांत्रिक अडचण दाखवून दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गावकऱ्यांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पूर्ण तयार असून मागील दहा वर्षांपासून पाण्यासाठी होणाऱ्या यातना थांबणार आहे. सध्या गावाची शोभा वाढविण्याºया पाण्याच्या टाकीला व जलशुद्धीकरण केंद्राकडून गावकºयांना पाणी फेब्रुवारी महिन्याअखेर न दिल्यास गावकऱ्यांच्या समक्ष ग्रामपंचायतीला कुलूप ठोकू, असा इशारा तंमुस अध्यक्ष धीरज बांबोडे व ग्रा.पं. सदस्य अमोल कातकर यांनी दिला आहे.

येत्या आठ दिवसांच्या आत ग्रा.पं. कडून थकित वीज देयकाचा भरणा करणार असून प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाला त्रुट्या असलेल्या कामाची यादी सादर केली आहे. त्रुट्या पूर्ण झाल्यानंतर व चाचपणीअंती योजना ग्रा.पं. ला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- एकनाथ पिंपळशेंडे, ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं. कोठारी

Web Title: Acquisition of water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.