बल्लारपुरात वर्षभरात ३६९४ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:00+5:302021-02-06T04:52:00+5:30
बल्लारपूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो जड वाहनांची वर्दळ असते. शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे वाहतूक शाखेचे ...
बल्लारपूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो जड वाहनांची वर्दळ असते. शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे वाहतूक शाखेचे कर्तव्य आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडत असतात. मागील वर्षभरात बेशिस्त वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे, विनालायसन्स वाहन चालविणे, अवैध वाहतूक, हेल्मेट परिधान न करणे, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे आदी नियमांचा भंग करणाऱ्या ३ हजार ६९४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार ७८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांना नियम पाळण्याची समज देण्यात आली. वर्षभरात रस्त्यावर अडथळे निर्माण करणाऱ्या १६४ जणांना भादंविच्या कलम २८३ नुसार जणांवर कारवाई करून कोर्टात पाठविण्यात आले. भरधाव वाहन चालविणाऱ्या २० जणांना भादंविचे २७९ प्रमाणे कारवाई करून दंड आकारण्यात आला. मोटार वाहन कायदा १८५ प्रमाणे २५ जणांवर कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त हयगयीने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करून वर्षभरात एकूण ३ हजार ६९४ जणांचे चालान फाडण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या निलेश माळवे यांनी दिली.
कोट
सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून, शहरात ठिकठिकाणी वाहतुकीबाबत फलक लावण्यात आलेले आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे. चारचाकीस्वारांनी सीटबेल्टचा वापर करावा. तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे.
-उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर