नियमभंग करणाऱ्या चार हजार ४२७ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:19+5:302021-05-31T04:21:19+5:30
बल्लारपूर : कोरोनाकाळात भरउन्हात पोलीस आपली ड्युटी करत असून पाच महिन्यांत शहरात मास्क न वापरता मोटार वाहतुकीचे नियम मोडून ...
बल्लारपूर : कोरोनाकाळात भरउन्हात पोलीस आपली ड्युटी करत असून पाच महिन्यांत शहरात मास्क न वापरता मोटार वाहतुकीचे नियम मोडून विनाकारण वाहनावर फिरणाऱ्या चार हजार ४२७ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून १० लाख ७० हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
सदर कारवाई जानेवारी ते २९ मे पर्यंतची असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात वाहतूक शाखेचे नायक पोलीस हवालदार निलेश माळवे यांनी सांगितले की, शहरात विनालायसन्स चालवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा ५०० वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. तसेच दारू पिऊन गाडी चालवणे अशा ४५ जणांवर कलम १८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली. निष्काळजीपणाने वाहन चालविणाऱ्या ७० जणांवर कलम २७९ प्रमाणे कारवाई करण्यात आली. नो पार्किंग रस्त्यावर वाहन उभे करणाऱ्या ८० जणांवर कलम २८३ प्रमाणे कारवाई करण्यात आली. तसेच लायसन्स जवळ न बाळगणे, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे इत्यादी नियमभंग करणाऱ्या एकूण चार हजार ४२७ जणांकडून १० लाख ७० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
बॉक्स
महिनानिहाय कारवाई
जानेवारी महिन्यात ७४९ जणांवर कारवाई, फेब्रुवारी ७४२ जणांवर, मार्च महिन्यात ६६२ जणांवर, एप्रिल महिन्यात १११८ जणांवर तर मे महिन्यात नियम मोडणाऱ्या १ हजार ४३८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
कोट
शहरात नियम तोडून वाहन चालविणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तरी वाहतूक पोलीस त्यांना समजविण्याचा प्रयत्न करतात. परंतु भरधाव गाडी चालवणे, मोबाइलवर बोलत वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन पळवणे अशांची संख्या वाढतच आहे म्हणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९ जणांचे प्रस्ताव निलंबनासाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहे.
-उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर