वरोरा पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकांडून ७० जणांवर कारवाई
By admin | Published: January 14, 2017 12:42 AM2017-01-14T00:42:32+5:302017-01-14T00:42:32+5:30
उघड्यावर शौचास बसू नका असे आवाहन न.प. वरोराच्या वतीने वारंवार केले जात आहे.
उघड्यावर शौचास बसू नका : प्रत्येकी ५० रुपये दंड वसूल
वरोरा : उघड्यावर शौचास बसू नका असे आवाहन न.प. वरोराच्या वतीने वारंवार केले जात आहे. तरीपण शहरातील अनेक व्यक्ती उघड्यावर शौचालयाला जात असल्याने न.प. प्रशासनाच्या गुड मार्निंग पथकाने आतापर्यंत ७० व्यक्तीवर कारवाई करीत प्रत्येकी ५० रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई सुरूच असून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
वरोरा न.प हद्दीतील नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा, शौचालय नसल्यास सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा, असे प्रयत्न मागील कित्येक दिवसांपासून केले जात आहे. शहरातील १४६० व्यक्तींना घरी शौचालय बांधकाम करीता अनुदान देण्यात आले असून ९०० शौचालयाचे बांधकाम पूर्ण होवून वापरणे सुरू केले. उर्वरीत बांधकाम सुरू आहे तर काहींनी अनुदान घेवून शौचालयाचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आले नाही. अशांना न.प. प्रशासनाच्या वतीने नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.
उघड्यावर शौचालय करु नये याकरिता न.प. च्या वतीने गुड मार्निंग पथकाची स्थापना करण्यात आली. प्रारंभी उघड्यावर शौचालय करू नये याकरीता परावृत्त करण्यात येत होते. त्यानंतर उघड्यावर शौचालय करणाऱ्यांविरुद्ध लेखी समज देण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)
अनुदान घेणाऱ्यावर
पोलिसात गुन्हे दाखल
अनुदान घेवून अद्यापही शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले नाही, अशा व्यक्तीवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची मोहिम १६ जानेवारीपासून राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक भूषण सालवटकर यांनी दिली.